ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सोमवारी सकाळी विस्कळीत झालेली ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्तानंतर रेल्वे प्रशासनाला बिघाड दुरूस्त करण्यात यश आले. मात्र, यादरम्यान प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. सध्या वाहतूक पूर्ववत झाली असली तरी वाहतुकीचा वेग अत्यंत धीमा आहे.
आज सकाळी घणसोली-रबाळे या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ऐन गर्दीच्या वेळेत या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळांचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला होता. दरम्यान, वाशी आणि पनवेलकडे जाणा-या प्रवाशांना कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. काल सुट्टीच्या दिवशीही ऐरोलीजवल ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्सहार्बरची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.