ऑफिस आणि घराच्या चार भिंतींबाहेरचं जग अनेकांना खुणावत असतं. प्रवास म्हणजे हे चौकटीबाहेरचं जग पाहण्याची संधी. नवा प्रदेश, नवे लोक, नवी भाषा, नव्या चालीरीती.. जाणून घेताना, त्यात सहज समरस होता यावं, खिशाला झळही बसू नये आणि सुरक्षितही राहता यावं यासाठी तुमचा हा वाटाडय़ा..

  • प्रवासाला निघण्यापूर्वी बॅग भरताना काय वस्तू लागतात याची यादी करूनच बॅग भरावी. यादी केल्यामुळे कुठल्या वस्तू बॅगेत भरल्यात हे लक्षात राहतं.
  • फार सामान नेऊ नये. गरजेपुरतंच सामान बरोबर घ्यावं.
  • आपण जे सामान नेतोय त्याची एक यादी आपल्या बॅगेत तयार असावी.
  • पहिल्यांदाच विमान प्रवास करत असल्यास हॅण्डबॅग आणि केबिन लगेजमध्ये काय न्यावं याची माहिती करून घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी.
  • विमानातही आपल्याबरोबर पर्समध्ये किंवा हॅण्डबॅगेत एखादा टॉप किंवा कुर्ता ठेवावा. विमानात खाताना कपडय़ांवर काही सांडल्यास लगेच कपडे बदलता येऊ शकतात.
  • तुम्ही कुठे प्रवासाला जाताय त्यानुसार कपडे बॅगेत असावेत. पाण्याच्या ठिकाणी जाणार असाल तर त्याकरता एखादा अधिक जोड बरोबर घ्यावा. थंड प्रदेशासाठी पुरेसे लोकरी कपडे घ्यावेत.
  • ॠतूनुसार कपडे सोबत असावेत. आपल्या टूर चालकाकडून तसेच इंटरनेटवरून आपण ज्या प्रदेशात जाणार आहोत तेथील हवामानाची माहिती मिळवावी.
  • परदेश प्रवासात वजनावर बंधन असते. मर्यादेपेक्षा अधिक वजन अधिक अधिभार भरून आणता येते. पण त्यामुळे सामानाची व्यवस्था करताना तुमचीच गैरसोय वाढू शकते. त्यामुळे मुळातच मर्यादित वजन सोबत नेणं उत्तम.