पक्षादेश झुगारून काँग्रेसच्या नगरसेविकेची परवानगी

मुंबई : शीव कोळीवाडा येथील एका इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी वृक्ष प्राधिकरणाने २२ झाडे कापण्याची परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात तेथील सर्वच ६९ झाडे मूळासकट कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उघडकीस आणला असून त्यांच्याच पक्षाच्या एका नगरसेविकेने ही झाडे कापण्यास मंजुरी देण्यासाठी स्वाक्षरी केली आहे.  शीव कोळीवाडा परिसरातील सरदार नगर येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील तीन इमारती धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या इमारतींच्या पुनर्विकासात काही झाडे अडथळा बनली होती. त्यामुळे संबंधित विकासकाने काही वृक्ष हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला होता.

दहापेक्षा अधिक झाडे हटविण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांमार्फत संबंधित ठिकाणीचा पाहणी करण्यात येते. त्यानंतर झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात येतो. या प्रकरणात संबंधित ठिकाणी ६९ झाडे होती. त्यापैकी ३६ झाडे तशीच ठेवणे, २२ कापणे व ११ पुनरेपित करणे यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी देलिी होती. मात्र, प्रत्यक्षात तेथील सरसकट सर्वच झाडे कापण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा हा प्रभाग असून त्यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. तसेच इमारतींच्या पुनर्विकासात अडथळा नसलेली झाडे कापण्यासाठी दिलेल्या परवानगीची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

‘३६ हजाहून झाडांची कत्तल’

 २०१० ते २०२१ या दहा वर्षांच्या कालावाधीत तब्बल ३८ हजार ८९९ झाडे हटवण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली असून त्यापैकी ३६ हजाहून अधिक झाडे पुनरेपित करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुनरेपण हा एक फार्स असून पुनरेपित झाडे जगत नाहीत. त्यामुळे या झाडांचीही कत्तल झाली असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या झाडांपैकी २१ हजार २५३ झाडे खासगी विकास प्रकल्पासाठी कापण्यात आली आहेत. झाडांच्या कत्तलीसाठी मंजुरी देण्याकरीता ठराविक रक्कम घेतली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. 

शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

झाडे कापण्यावरून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाला जाब विचारलेला असला तरी ही झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीमधील काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा राय यांनीच पाहणी करून स्वाक्षरी करून मंजुरी दिल्याचे आढळून आले आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा झाडे कापण्यास विरोध असताना पक्षादेश झुगारून राय यांनी ही मंजुरी दिल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी राय यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी राजा यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे केली आहे.