मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील बीकेसी – आचार्य अत्रे चौक दरम्यानचा ९.७७ किमी लांबीचा टप्पा २ अ सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मंगळवारी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. एमएमआरसीने मंगळवारी धारावी मेट्रो स्थानक – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान (वरळी) मेट्रो गाडीची चाचणी केली. यावेळी पहिल्यांदाच मेट्रो गाडी मिठी नदीखालून धावली. या मार्गिकेवरून यशस्वीरित्या मेट्रो गाडी धावल्याने आता गाड्यांच्या चाचण्यांसह यंत्रणा, सिग्नल आणि इतर चाचण्यांना सुरुवात होणार आहे. तर चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मार्चमध्ये मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.

एमएमआरसी ३२.५ किमी लांबीच्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे बांधकाम करीत आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा १२.६९ किमी लांबीचा टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा सेवेत दाखल झाल्याने मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोतून अतिजलद आणि सुकर प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी काही कारणाने या सेवेला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आरे – बीकेसी मार्गिकेवरून दिवसाला चार लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात आज या मार्गिकेवरून दिवसाला केवळ २० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यामुळे ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर आहे. संपूर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवासी संख्या वाढेल असा मुद्दा उपस्थित करीत एमएमआरसीने आता बीकेसी – आचार्य अत्रे चौक मार्ग टप्पा २ अ आणि आचार्य अत्रे चौक मार्ग – कुलाबा टप्पा २ ब च्या कामाला वेग दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टप्पा २ अ मार्चअखेरीस पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. त्यानुसार या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्यक्षात हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने एमएमआरसीने मंगळवारी एक महत्त्वाचे पाऊल टाकले. धारावी मेट्रो स्थानक -ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान (वरळी) मंगळवारी पहिल्यांदाच मेट्रो गाडी धावली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मेट्रो गाडी मिठी नदीखालून पुढे दादर, वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या दिशेने गेली. मेट्रो गाडी यशस्वीरित्या टप्पा २ अ दरम्यान धावल्याने आता टप्पा २ अ दृष्टीक्षेपात आला आहे. रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) चाचण्या करण्याची आता टप्पा २ अ साठी आवश्यक नाही. आरे – बीकेसी टप्पा सुरू करतानाचा हे प्रमाणपत्र मिळाले असल्याने आता आरडीएसओची चाचण्यांची गरज नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आता टप्पा २ अ च्या अनुषंगाने विविध चाचण्यांना सुरुवात करून, चाचण्यांना वेग देत मार्चमध्ये मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. एकूणच मार्चमध्ये सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मार्चअखेरपर्यंत टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.