या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांदिवली स्थानकाजवळ  ट्रकने वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. यावेळी एक्स्प्रेसमध्ये २८४ प्रवाशी होते. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी पश्चिम रेल्वेचा निष्काळजीपणा दिसून आला. रेल्वेमार्गात ट्रक नेणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच, या अपघाताची चौकशी करण्याकरिता पश्चिम रेल्वेने समिती नेमली आहे.

सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी मोजक्या लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. तसेच, परराज्यात जाण्यासाठी विशेष गाडय़ा सोडल्या जात आहेत. या गाडय़ा वगळता फारशी रेल्वे वाहतूक नाही. त्यामुळे रेल्वेकडून अनेक छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. परंतु ही कामे करतानाही सुरक्षिततेची काळजी रेल्वेकडून घेण्यात येते का, असा प्रश्न सोमवारी घडलेल्या घटनेनंतर पडला. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली सहाव्या मार्गाचे काम सुरु आहे. या कामाकरिता कांदिवली स्थानकाजवळ रेल्वे हद्दीत मालवाहू ट्रकची ये-जा सुरू असते.

सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कांदिवली स्थानकाच्या दक्षिण दिशेकडून एका मालवाहू ट्रकने रेल्वे हद्दीत प्रवेश केला. हा ट्रक रूळाजवळ होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या गाडी क्रमांक ०२९२५ वांद्रे टर्मिनस ते अमृतसर पश्चिम एक्स्प्रेसला ट्रकची धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा काही भाग चेपला गेला. धडक लागल्याचे समजताच एक्स्प्रेसच्या लोको पायलटने त्वरीत आपत्कालिन ब्रेक दाबून एक्स्प्रेस थांबवली. पश्चिम एक्स्प्रेसमधून २८४ प्रवासी प्रवास करत होते. यावेळी कोणतीही जिवितहानी झाली नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले की, या अपघाताची रेल्वेकडून चौकशी केली जाणार असून त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. एक्स्प्रसचे इंजिन बोरीवली स्थानकात बदलण्यात आले. त्यानंतर ती दुपारी अडीचच्या सुमारास रवाना झाली.

रेल्वेचे चार अधिकारी-कर्मचारी निलंबित

पश्चिम एक्स्प्रेस व ट्रकच्या अपघातानंतर पश्चिम रेल्वेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. ट्रक चालक प्रकाश ठोके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल  कांदिवली स्थानकाचे अधीक्षक बी. व्ही. सामंत, स्थानक अधीक्षक विनोद दळवी, वाहतूक निरीक्षक एम. एस. शेख, पॉईंट्समन भरत सोलंकी यांना निलंबित केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत हे चारही कर्मचारी निलंबित राहतील. महत्वाची बाब म्हणजे या निलंबनाच्या कारवाईतून अभियंते आणि कामाशी संबंधित अन्य वरिष्ठ अधिकारी मात्र सुटले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck hits amritsar paschim express abn
First published on: 21-07-2020 at 01:24 IST