मोठ्या कार्यक्रमात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्री-मॉडेल्स यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पकडले. अभिनेत्रींना फसवून या व्यवसायात ढकलणारी एक साखळीच उघडकीस आली असून, कबीर नावाची एक व्यक्ती यामागे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पोलिसांनी तीन अभिनेत्रींची सुटका केली आहे.
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना चांगल्या कार्यक्रमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष कबीर नावाची व्यक्ती दाखवत होता. या अभिनेत्रींची छायाचित्रे घेऊन ती ग्राहकांना पुरवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोमवार, ६ जून रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास गोरेगावच्या ओबेरॉय मॉलसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. त्यावेळी दोन दलाल तीन मुलींना घेऊन तिथे पोहोचले. पैशांची देवाणघेवाण झाल्यावर पोलिसांनी छापा मारत दोन्ही दलालांना पकडले. दलालांमध्ये एक महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. चौकशीत कबीर नावाच्या व्यक्तीसाठी काम करत असल्याचे या दलालांना सांगितले. पाच हजार रुपयांना या तरुणींचा सौदा केला जात होता. समाजसेवा शाखेने या दलालांना दिंडोशी पोलिसांच्या हवाली केले असून, कबीर नावाची व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.