ढोल-ताशा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच या कलेला उत्तेजन मिळून नव्या पिढीने याकडे वळावे या करिता ‘मी मुलुंडकर’ संस्थेतर्फे १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी मुलुंड येथे दोन दिवसांच्या ढोल महोत्सवाचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे.
गेल्या वर्षी मुंबई, ठाणे परिसरांतील १२ ढोलपथके स्पर्धेत सहभागी झाली होती. यंदाच्या वर्षी त्यात आणखी वाढ होईल. मुलुंड (पूर्व) येथील संभाजीराजे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी प्रत्येक ढोल-ताशा पथकाला पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या वेळेत आपले सादरीकरण करणे अपेक्षित असल्याची माहिती ‘मी मुलुंडकर’चे राहुल बाणावली यांनी दिली.
१५ ढोल, ५ ताशे आणि प्रत्येकी एक हलगी, शंख, डफ व टोल या वाद्यांच्या साहाय्याने सहभागी पथकांनी ताल सादर करायचा आहे. महोत्सवाची सुरुवात ‘जनगणमन’ या राष्ट्रगीताने होणार आहे. महोत्सवात सहभागी झालेली सर्व ढोल-ताशा पथके एकाच वेळी ढोल-ताशावर ‘जनगणमन’ सादर करतील, असेही बाणावली यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ढोल-ताशा पथकांनी सादर केलेली वादनकला रसिकांना प्रत्यक्ष पाहता, ऐकता आणि अनुभवता येणार आहे. मुंबई व परिसरातील जास्तीत जास्त ढोल-ताशा पथकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मी मुलुंडकर’ संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी राहुल बाणावली यांच्याशी  ९००४७६५००० या क्रमांकावर संपर्क साधावा.