मुंबई- हिरे दलालांकडून हिरे व्यापाऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. वांद्र्याच्या बीकेसी येथील दोन वेगवेगळ्या हिरे व्यापाऱ्यांची दलालांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. विक्रीसाठी हिरे घेऊन त्यांनी पोबारा केला आहे. या दोन्ही प्रकरणात एकाच दिवशी बीकेसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात ३९ लाखांची तर दुसऱ्या प्रकरणात १३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत मनोजभाई अमदावादी (३८) या हिरे व्यापाऱ्याची ३९ लाखांची फसवणूक झाली आहे. त्यांची ‘श्री रामदूत जेम्स एलएलपी’ नावाची हिरे खरेदी-विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीचे बीकेसी येथे कार्यालय आहे. कंपनीकडून हिरे व्यापारी आणि दलाल (ब्रोकर) यांना झांगड पावतीवर विक्रीसाठी हिरे दिले जातात. विश्वासाने हा व्यवहार केला जातो.

फिर्यादी यांच्या कार्यालयात सेल्स धिरुक्रिष्ण शोरेवाला हा कर्मचारी काम करतो. तो हिरे व्यापारी आणि दलाल यांच्या संपर्कात असतो. दलालांकडून मागणी प्राप्त झाल्यास तो हिरे देऊन पुढील आर्थिक व्यवहार पूर्ण करत असतो. २०२२ मध्ये आरोपी जयनिश प्रकाशभाई डहयानी (४०) हा शोरेवाला याच्या संपर्कात आला होता. यापूर्वी दलाल डहयानी याने काही हिरे विक्रीसाठी घेतले होते आणि त्याचा व्यवहार पूर्ण केला होता. त्यामुळे कंपनीचा डहयानी याच्यावर विश्वास बसला होता.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात डहियानी याने हिर्यांची एक मोठी ऑर्डर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कंपनीने त्याला तीन टप्प्यात २४. ६६ कॅरेटचे एकुण ३९ लाख ५३ हजार रुपये किंमतीचे हिरे पाठविले. नंतर मात्र त्याचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ तो करू लागला. ग्राहकाकडून लवकर पैसे मिळतील अशी सबब सांगून तो वेळ मारून नेत होता. मात्र बराच कालावधी उलटूनही डहायनी याने पैसे परत केले नाही. त्यामुळे कंपनीने ३९ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

या फसवणुकीप्रकरणी फिर्यादी अमदावादी यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हिरे दलाल जयनशी डहयानी याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत घनश्यामभाई कालसरिया (४६) या हिरे व्यापार्याची दलालाने १३ लाखांची फसवणूक केली आहे. कलसारिया यांची बीकेसी मध्ये ‘जे.ए.एम्पेक्स’ नावाची हिरे खरेदी विक्रीची कंपनी आहे. त्यांच्याकडे मागील ३ वर्षापासून सिध्दार्थ रवासा हा हिरे खरेदी विक्रीचे व्यवहार करत होता. त्यामुळे त्याच्यावर फिर्यादी कालसरिया यांचा विश्वास होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर २०२४ रोजी फिर्यादी कालसरिया यांच्याडून वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण २७. ४१ कॅरेटचे १३ लाख २० हजार रुपयांचे हिरे विक्रीसाठी घेतले होते. मात्र विहित वेळेत त्याने पैसे दिले नाही. वेगवेगळी कारणे सांगून तो पैसे देण्यास टाळू लागला. त्याविरोधात कालसरिया यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी हिरे दलाल सिध्दार्थ रावसा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१६ (५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.