मुंबई : सेवा विकास को-ऑपरेटिव्ह (एसव्हीसी) बँकेतील फसवणूक प्रकरणी तपास करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार तीन जणांना अटक केली आहे. ईडीने एसव्हीसी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांचा निकटवर्तीय बबलू सोनकर आणि ईडी कार्यालयात काम करणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना (ऑफिस बॉय) अटक केली आहे. आरोपींना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या तपासाची गोपनीय कागदपत्रांची माहिती देण्यासाठी लाच मागितल्याचा आणि ती स्वीकारल्याच्या आरोपावरून ईडी कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि मुलचंदानीच्या जवळील सहकाऱ्याला शुक्रवारी अटक केली आहे. पुण्यातील व्यावसायिक अमर मुलचंदानी यांना काही गोपनीय कागदपत्रे विकल्याचे चौकशीत समोर आले आहे. पुण्यातील सेवा विकास कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अमर मुलचंदानी हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह (एसव्हीसी) बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांचा निकटवर्तीय बबलू सोनकर याच्याकडून १३ हजार रुपये स्वीकारल्यानंतर त्याला मदत केल्याप्रकरणी योगेश वाघुळे, विशाल कुडेकर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तसेच सोनकरला ईडीने अटक केली. तिघांना विशेष पीएमएलए न्यायालयासमोर शुक्रवारी हजर करण्यात आले. त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
तपास सुरू
मूलचंदानीला मदत करण्याच्या हेतूने ईडीच्या कार्यालयातील गुप्त कागदपत्रे मिळवण्यासाठी लाच देण्यात आली होती. बबलू सोनकरच्या ताब्यातून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली असून ईडीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बबलू सोनकरला संवेदनशील माहिती देत असल्याचे मान्य केले, असे ईडीकडून सांगण्यात आले. याप्रकरणी ईडीचा अधिक तपास सुरू आहे.