संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई: गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी आदी छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत तसेच मधुमेह आणि रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये अवघ्या पावणेदोन महिन्यात दोन लाख रुग्णांवर उपचार तसंच आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेचा लवकरच राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात विस्तार केला जाणार असून जास्तीतजास्त लोकांना दैनंदिन आजारांसाठी प्रभावीपणे या दवाखान्यांच्या माध्यमातून उपचार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईतील ६२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘बाळासाहेब आपला दवाखाना’च्या माध्यमातून ही रुग्ण तपासणी झाली असून आगामी सहा महिन्यात मुंबईत एकूण २२० दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजयकुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्यमंत्री असताना त्यांना शहरी तसेच ग्रामीण भागातील दैनंदिन आजारी पडणाऱ्या रुग्णांचा विचार करून ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी पहिल्या टप्प्यात राज्यात ३०० दवाखाने सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी धारावी परिसरातील शीव-वांद्रे लिंक रोडनजिक असणा-या ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोननजिक आयोजित एका समारंभात दृकश्राव्य प्रणालीचा वापर करुन ५१ ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे लोकार्पण एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणखी ११ दवाखान्यांची भर घातली असून या ६२ दवाखान्यांच्या माध्यमातून अवघ्या पावणेदोन महिन्यात दोन लाखाहून अधिक रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या दवाखान्यात डॉक्टरांच्या माध्यमातून केवळ उपचारच केले जात नाहीत तर जवळपास १४७ प्रकारच्या चाचण्याही केल्या जातात. याशिवाय पालिकेच्या पॅनेलवरील डायग्नोस्टिक केंद्रांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, मेमोग्राफी, एक्स-रे आदी चाचण्याही पालिका रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दरांप्रमाणे केल्या जात आहेत.

प्रामुख्याने हे सर्व दवाखाने गरीबवस्ती वा झोपडपट्टी परिसरानजीक स्थापन करण्यात आल्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या साठ लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. साधारणपणे २५ ते ३० हजार लोकवस्तीसासाठी एक दवाखाना या प्रकारे दवाखाने उभारण्यात येणार असून सकाळी सात ते दुपारी दोन आणि त्यानंतर दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत हे दवाखाने चालविण्यात येत आहेत. या दवाखान्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक औषधनिर्माता आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटी तत्त्वावार नियुक्ती करण्यात येते.

याबाबत पालिका सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेअंतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना त्याच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी उपलब्ध दवाखान्यांमध्ये दुस-या टप्प्यात पोर्टा केबिनच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबर २०२२ पासून ५१ दवाखाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत ६२ दवाखाने सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे आगामी सहा महिन्यात २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरु करण्याकरिता टप्पेनिहाय कार्यवाही करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण २२० ठिकाणी हे दवाखाने चालवले जाणार आहेत.

तसेच उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवाही पॉली-क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमार्फत देण्यात येत आहे. उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येणार आहे. सदर दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल, ज्या योगे बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे कामकाज हे कागदविरहित पद्धतीने (पेपरलेस) केले जाणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकानजीक बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करून जनतेच्या दैनंदिन आरोग्याची प्रभावीपणे काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two lakh patients were examined in 45 days at balasaheb thackeray aapla dawakhana in mumbai scj
First published on: 10-01-2023 at 19:38 IST