मुंबई : सध्या हिंदीतील मोठ्या चित्रपटांची फारशी स्पर्धा नसताना आधी प्रदर्शित झालेले काही मराठी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचे धाडस निर्माते व दिग्दर्शकांनी केले आहे. याआधी ‘सैराट’ व ‘बिनधास्त’ हे दोन मराठी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते. आता ‘अल्याड पल्याड’ व ‘फौजी’ हे दोन मराठी चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे हिंदीपाठोपाठ आता मराठी चित्रपटसृष्टीतही पुनःप्रदर्शनाचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे.
मराठी प्रेक्षकांचा कल सध्या वेगळ्या धाटणीतील चित्रपट पाहण्याकडे अधिक आहे. हे लक्षात घेत गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला ‘अल्याड पल्याड’ हा विनोदी भयपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. काळजाचा थरकाप उडवणारा आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा प्रितम एस. के. पाटील दिग्दर्शित ‘अल्याड पल्याड’ हा मराठी भयपट २७ जून २०२५ पासून चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र सद्य:स्थितीत मराठी भयपट व वेबमालिकांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.
या चित्रपटाबरोबरच सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा पोटतिडकीने मांडणारा आणि जवानांचे आयुष्य, त्यांच्या निस्सीम देशसेवेवर आधारित घन:शाम येडे लिखित – दिग्दर्शित ‘फौजी’ हा चित्रपट येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पुन्हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता, मात्र कमी चित्रपटगृहातून शो मिळण्यासह अन्य काही कारणांमुळे हा चित्रपट अनेकांपर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. आता हिंदीप्रमाणेच मराठीतही चित्रपटांच्या पुनःप्रदर्शनाचा प्रयोग यशस्वी होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘सध्या मराठी प्रेक्षकांचा कल निरनिराळ्या कथानकांवर आधारित चित्रपट पाहण्याकडे आहे. वेगळ्या धाटणीतील चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एक वेगळे कथानक असलेल्या उत्कंठावर्धक ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाला गतवर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आल्यामुळे चित्रपटगृहात पुनःप्रदर्शनाचा निर्णय घेतला आहे’, असे दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर ‘अनेकदा मराठी चित्रपटांचे फलक चित्रपटगृहाच्या आवारात व्यवस्थितपणे लागत नाहीत. तसेच मराठी चित्रपटांना जास्त शो मिळत नाहीत, मात्र मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांना व्यवस्थित प्रसिद्धी व अधिक शो मिळतात. या अडचणींचा सामना आम्हाला गतवर्षी करावा लागला होता, त्यामुळे अनेकांना ‘फौजी’ चित्रपट व्यवस्थितपणे पाहता आला नाही.
देशभक्तीचे महत्त्व पटवून देणारा हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सहनिर्मात्या स्वप्नजा विश्वनाथ नाथ यांच्या सहकार्याने पुन्हा प्रदर्शित करीत आहोत’, असे ‘फौजी’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते घन:शाम येडे यांनी सांगितले.