मुंबईतल्या चेंबूर भागात सोमवारी एक भीषण अपघात घडला. केस कापून येतो असं सांगून निघालेले दोन तरूण घरी परतलेच नाहीत. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा हेअरकट ठरला कारण चेंबूर हायवेवर झालेल्या या अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. टिळक नगर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

टिळक नगर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमेश उगमाशी पाड्या हा आपल्या दोन मित्रांसह बाईकवरून ट्रिपल सीट आणि भरधाव वेगात चालला होता. त्यावेळी अचानक त्याच्या समोर कार आली. ज्यानंतर त्याचा बाईकवरचा ताबा सुटला. ही बाईक घसरली. हिमेश जवळच्या दुभाजकावर आपटला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात हिमेश आणि लक्ष्य जैस्वाल हे दोघंही जागीच ठार झाले. तर आशिष गुप्ता हा या दोघांचा तिसरा मित्र गंभीर जखमी झाला. या तिघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

हिमेश पाड्याने आईला काय सांगितलं होतं?

हिमेश पाड्या, लक्ष्य जैस्वाल आणि अनिश गुप्ता हे तिघेही १७ वर्षांचे तरूण. सोमवारी हिमेशने आईला सांगितलं की मी केस कापून येतो. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याचा हेअर कट झाला. त्यानंतर केसांना लावण्यासाठी जेल घ्यायचं म्हणून हे तिघं बाईकवरून चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला. ही घटना घडताच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने या तिघांनाही रूग्णालयात नेलं मात्र तिथे हिमेश आणि लक्ष्य या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे हे डॉक्टरांनी जाहीर केलं. हिमेश पाड्या हा सोशल मीडिया स्टार होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. मिड-डे ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

हिमेश, लक्ष्य आणि अनिश तिघेही एकाच चाळीतले रहिवासी

हिमेश पाड्या, लक्ष्य जैस्वाल आणि अनिश गुप्ता हे तिघेही कुर्ला या ठिकाणी असलेल्या शंकर चाळीत राहातात. हिमेशचा चुलत भाऊ दिनेश बरिया म्हणाला की हिमेशचं सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोइंग होतं. त्यामुळे त्याला चांगले कपडे घालायची आणि हेअरकट करायची आवड होती. १६ जानेवारीला त्याने वडिलांकडे हेअरकटसाठी पैसे मागितले होते. मात्र त्यांनी पैसे द्यायला नकार दिला. वडिलांनी नकार दिल्याने हिमेश खूप नाराज झाला. त्याची नाराजी पाहून अखेर वडिलांनी त्याला पैसे दिले. आईला त्याने हेअरकट करून येतो आहे घरी आल्यानंतर अंघोळ करेन माझ्यासाठी पाणी गरम करून ठेव असंही सांगितलं मात्र तो परत आलाच नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिश गुप्ताने काय सांगितलं?

या दोघांचा मित्र अनिश गुप्ता याने सांगितलं मी अपघातात माझे दोन चांगले मित्र गमावले आहेत. हिमेश अकरावीत शिकत होता. तर जैस्वाल हा सायन्सचा विद्यार्थी होता. आता माझे दोन्ही मित्र मी गमावले आहेत. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने हे सांगितलं की आम्ही हिमेशच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे कारण त्याने हेल्मेट घातलं नव्हतं, त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. तसंच त्याच्या मागे बसलेल्यांपैकीही कुणीच हेल्मेट घातलेलं नव्हतं.