मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दोन नियमित फेऱ्यांनंतर मुंबई विभागांतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या चार जिल्ह्यांमध्ये १ लाख ४३ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये ८७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या फेरीमध्ये ५६ हजार ६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन्ही फेऱ्यांमध्ये वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक ६६ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. महामुंबईत असलेल्या ४ लाख ६७ हजार ७२० जागांपैकी १ लाख ४३ हजार ५४६ जागांवर प्रवेश झाले असून, अद्यापही ३ लाख २८ हजार २३४ जागा रिक्त आहेत. तर अजूनही एक लाखावर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीला ३० जूनपासून सुरूवात झाली. मुंबई विभागातील ४ लाख ७१ हजार ७८० जागांसाठी पहिल्या फेरीमध्ये १ लाख ३९ हजार ९४३ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या होत्या. यापैकी ८७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर दुसऱ्या फेरीमध्ये ७९ हजार ४०३ विद्यार्थ्यांना जागा जाहीर झाल्या. मात्र यापैकी ५६ हजार ६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने ३ लाख २८ हजार २३४ जागा तिसऱ्या फेरीसाठी रिक्त राहिल्या आहेत. मुंबईमधील १ लाख ९९ हजार २१० जागा, ठाण्यामधील १ लाख ५८ हजार २४०, पालघरमधील ६५ हजार २७० आणि रायगडमधील ४९ हजार ६० इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत.
अकरावीच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये मुंबईतून सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. यामध्ये मुंबईतून पहिल्या फेरीत ३५ हजार ८०३, तर दुसऱ्या फेरीत २७ हजार ८०७ असे ६३ हजार ६०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. त्याखालोखाल ठाण्यातून ४८ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, यामध्ये पहिल्या फेरीमध्ये ३० हजार ३३७ आणि दुसऱ्या फेरीमध्ये १८ हजार १६१ विद्यार्थांनी प्रवेश घेतला. रायगडमध्ये पहिल्या फेरीमध्ये ११ हजार ४३४, तर दुसऱ्या फेरीमध्ये ४ हजार ४८३ अशा एकूण १५ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर पालघरमधून दोन फेऱ्यानंतर १५ हजार ५२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, यामध्ये पहिल्या फेरीमध्ये ९ हजार ९६६, तर दुसऱ्या फेरीमध्ये ५ हजार ५६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
वाणिज्य शाखेत सर्वाधिक प्रवेश
मुंबई विभागातून वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक ६६ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये ३८ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या फेरीमध्ये २८ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल विज्ञान शाखेत ५८ हजार ८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये पहिल्या फेरीत ३६ हजार ८२९, तर दुसऱ्या फेरीत २१ हजार २५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन फेऱ्यानंतर कला शाखेमध्ये १८ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये पहिल्या फेरीमध्ये १२ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी, तर दुसऱ्या फेरीमध्ये ६ हजार १७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.