विशालयुतीचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच संपलेला आहे. आता मी कशाला परत खपली काढू, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विशालयुतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 
मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी विशालयुतीच्या मुद्द्यावर परत परत चर्चा नको, असे स्पष्ट केले. विशालयुतीचा प्रस्ताव मी ठेवला होता. त्यावर मनसेकडून काय उत्तर आले, हे सगळ्यांना माहितीये. त्यांच्याकडूनच हा विषय संपलेला आहे. आता उगाचच मी कशाला परत परत खपली काढू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना विशालयुतीमध्ये येणार का, या विषयावरील चर्चा आता थांबवा; नाहीतर माझ्याशी काही नेत्यांनी केलेली चर्चा उघड करावी लागेल, या शब्दांत राज ठाकरे यांनी सोमवारी युतीतील घटक पक्षांना फटकारले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही या विषयावरील चर्चा थांबविण्याचे वक्तव्य केले आहे.