शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आले होते. दोन्ही गटांनी दीड महिन्यापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. पण, अद्याप कुठल्याही गटाला परवानगी देण्यात आली नव्हती. तर, ठाकरे गटानं न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून शिवाजी पार्कसाठी देण्यात आलेला अर्ज मागे घेतला आहे.

याबद्दल शिवसेना ( शिंदे गट ) आमदार सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. पण, वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे,” अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा : “दसरा मेळावा आम्हाला करायचाच आहे, त्यामुळे…”, संजय शिरसाटांचं विधान; म्हणाले…

सदा सरवणकर म्हणाले, “दसरा हा हिंदूंचा सण आहे. हिंदूंच्या सणात कुठलाही वाद न होता, आनंदात साजरा व्हावा, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. शिवसेनेच्या वतीनं होणार दसरा मेळावा आझाद किंवा क्रॉस मैदानात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तशाप्रकारचे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.”

“दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार शिवाजी पार्क मैदानात ५० वर्षे ऐकता आले. हेच विचार आता आझाद किंवा क्रांती मैदानातून ऐकायला मिळतील, अशी आमची इच्छा आहे,” असं सरवणकरांनी सांगितलं.

मैदानासाठी न्यायालयात गेले असते, ठाकरे गटाला सहानभुती मिळाली असती, या प्रश्नावर सदा सरवणकर म्हणाले, “सहानभुतीसाठी मेळावा रद्द केला नाही. आम्हाला कुठलाही वाद करायचा नाही. काम करून संघटना मोठी करायची आहे. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची, हे एकनाथ शिंदेंचं धोरण आहे.”

हेही वाचा : “…आम्ही तसं बोललोच नाही”, शरद पवारांचा हुकुमशहा उल्लेख केल्याप्रकरणी अजित पवार गटाची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१ आणि ७ सप्टेंबरला शिवाजी पार्क मैदानासाठी मी पत्र दिलं होतं. परवानगी मिळणार नाही, म्हणून अर्ज मागे घेतला, असं नाही. एकनाथ शिंदेंचं धोरण अतिशय समजूतदारपणाचं आहे. सणांमध्ये वाद होऊ नये, अशी भावना एकनाथ शिंदेंची आहे. नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला,” असं सदा सरवणकरांनी सांगितलं.