आमची लढाई ही ‘मनसे’ वा ‘आप’शी नसून काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना सत्तेतून हद्दपार करण्याठी शिवसेना सर्व ताकदीनीशी निवडणुकीच्या लढाईत उतरेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी येत्या २३ जानेवारीरोजी सोमय्या मैदानावर शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व शिवसैनिक ‘शिवबंधना’त राहण्याची प्रतिज्ञा करतील असेही उद्धव म्हणाले.
महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे सोमय्या मैदानावर २३ जानेवारीरोजी आयोजन केले असून यावेळी सर्व शिवसैनिकांना हाताला बांधण्यासाठी ‘शिवबंधन धागा’ देण्यात येणर असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य करून काँग्रेस-राष्ट्रवादीचा नि:पात करण्याची प्रतिज्ञा देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. बाळासाहेबांनी मराठी व हिंदुंना ताठ मानेने जगायला शिकवले. त्यांना अपेक्षित असलेले ऐशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या भूमिकेसाठी शिवसैनिक कटीबद्ध राहातील असे वचन त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे.
या मेळाव्यात शिवसेनेची गर्जना ऐकायला मिळेल असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा हा मेळावा भाजपला ताकद दाखविण्यासाठी नसून कोणाला ताकद दाखवायची याची मला पूर्ण कल्पना आहे, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत असून पंतप्रधानपदाचे उमेदवार बनल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे राज यांच्या भूमिकेवर टीका केली. सवंग लोकप्रियेच्या घोषणा करत काही गोष्टी फुकट देण्याचे ‘आप’ने जाहीर केले असले तरी असले फुकटचे राजकारण करणे ही लोकांचीच फसवणूक असून ज्या गोष्टी आम्हाला करता येतील तेवढय़ाच घोषणा आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची लढाई ही मनसे अथवा आपशी नसून काँग्रेस-राष्ट्रवादीशीच असेल असेही उद्धव यांनी सांगितले.