मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार, हा प्रश्न अनुत्तरीत असताना आणि २० दिवसांनंतरही मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर काहीच कारण नसताना मुंबई महानगरपालिकेकडून निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आपल्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश महानगरपालिकेला देण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटातर्फे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी वकील जोएल कार्लोस यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. तसेच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागणाऱ्या आमच्या अर्जावर मुंबई महानगरपालिकेने अद्यापही निर्णय घेतलेला नाही आणि आम्हाला न्यायालयात येण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आमच्या अर्जावर महानगरपालिकेला तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी याचिका करण्यात आल्याचे कार्लोस यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयानेही याचिकेवर गुरुवारी सुनावणी ठेवली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची १९६६ मध्ये स्थापना केली होती. तेव्हापासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे आणि महानगरपालिकेकडून या मेळाव्याला दरवर्षी परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत म्हणजे २०२० आणि २०२१ मध्ये मेळावा घेण्यात आला नव्हता. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने त्या ठिकाणी खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना बंदी घालावी, अशी विनंतीची जनहित याचिका २००९ मध्ये उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतरही दसरा मेळावा व अन्य विशिष्ट कार्यक्रमांना अटींसह परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने २० जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र नगररचना कायद्यांतर्गत (एमआरटीपी) अधिसूचना काढून शिवाजी पार्कवर वर्षभरात खेळाव्यतिरिक्त विशिष्ट कार्यक्रमांना परवानगी दिली होती. त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा समावेश असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.