ठाकरे गटाने आज षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. मणिपूर येथील हिंसाचार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये सीरिया आणि लिबिया सारखी परिस्थिती निर्माण झाली असून तिथे भाजपाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “काल (रविवार, १८ जून) मी मणिपूरचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरला जायला हवं, असं मी म्हटलं होतं. तो उल्लेख मी मुद्दामहून केला होता. कारण सध्या मणिपूर पेटलेला आहे, पण आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर मोदींचे नवगुलाम झालेले लाचार मिंधे मला म्हणाले, सूर्यावर थुंकू नका. पण कोण सूर्य? कुठला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू तुमचा सूर्य असेल, तर तो सूर्य माणिपूरमध्ये का उगवत नाही? मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? मणिपूरमध्ये तो सूर्य उगवत नसेल, तर अशा सूर्याचं करायचं काय?”

हेही वाचा : “मोदींनी कोविड लस तयार केली मग संशोधक गवत…”, फडणवीसांचा ‘तो’ VIDEO दाखवत उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मणिपूरमध्ये राहणारे भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंह यांनी ट्वीट केलं होतं. मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य संपुष्टात आलं असून तिथे सीरिया आणि लिबियासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले. जनता पिसाळल्यानंतर काय होऊ शकतं? याची उदाहरणं निशिकांत यांनी ट्वीटमध्ये दिली. लिबियामध्ये ‘गद्दाफी’ नावाचा हुकूमशहा होता. जनता पेटल्यानंतर हा हुकूमशहा पळाला. लोकांना घाबरून तो गटाराच्या पाईपमध्ये लपून बसला. मग बंडखोरांनी गद्दाफीचे केस पकडून त्याला बाहेर खेचला आणि तुडवून-तुडवून रस्त्यातच मारला, अशी परिस्थिती आपल्याकडे झाली आहे, असं लेफ्टनंट जनरल सांगतायत.”

हेही वाचा : “श्रीकांतने एकच गोष्ट मागितली, बाप म्हणून तीही देऊ शकलो नाही”, एकनाथ शिंदेंनी सांगितली आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मणिपूरमध्ये डबल इंजिन सरकार कोसळलं आहे. रुळावरून घसरलं आहे. तिथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं आहे. भाजपाच्या नेत्यांवर हल्ले होतायत. ते भाजपावाले असले तरीही ते मारले जाऊ नये, हेच आमचं हिंदुत्व आहे,” असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.