मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखी एका माजी नगरसेवकाने ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. सायन कोळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक १७३ चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सायन कोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती. गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता. मात्र रविवारी सायन कोळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७३ चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे येथील टेंभी नाका परिसरात आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना (शिंदे) पक्षाचे उपनेते राहूल शेवाळे, सायन कोळीवाडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर उपस्थित होते. यावेळी रामदास कांबळे यांची युवा सेनेचे कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
यावेळी रामदास कांबळे म्हणाले की, मी माझ्या विभागात अनेक लोकोपयोगी कामे केली. पण गेल्या साडेतीन वर्षे जसा विकास व्हायला हवा तसा होत नव्हता. लोकांच्या विकासासाठी काही कामे करणे गरजेचे आहे. विभागातील ७० टक्के विभाग हा संक्रमण शिबीराचा आो. प्रतिक्षा नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक १८० चौरस फूटाच्या घरात वर्षानुवर्षे राहत आहेत. त्यांना हक्काची मोठी घरे मिळावी अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली. तसेच विभागातील सर्व विविध विकासकामांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. ही विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी कांबळे यांना दिले. माझ्या विभागाचा विकास आणि जनतेचे हित लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश करीत असल्याचे कांबळे यावेळी म्हणाले. तसेच माझ्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, वीस वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी काहीही कामे केली नाहीत. मात्र आम्ही सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, मुंबई मेट्रो अशा विविध प्रकल्पांवरील स्थगिती उठवून या कामांना गती दिली. आमच्या विकासकामांवर विश्वास ठेवून माजी नगरसेवक आमच्या पक्षात येत आहेत. केवळ निवडणूक आली की मुंबईकरांची आठवण काढणाऱ्यातले आम्ही नाही, असाही टोला शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
आतापर्यंत १२४ माजी नगरसेवक आले
आतापर्यंत एकूण १२४ माजी नगरसेवक आपल्या शिवसेनेत आल्याचा दावा एकनाथ शिंदे यावेळी केला. त्यात सर्वाधिक नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आहेत. हे सर्व नगरसेवक माझ्यावर विश्वास ठेवून आले आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
ही स्वबळाची तयारी आहे का?
आतापर्यंत १२४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर ही स्वबळाची तयारी आहे का, असा सवाल उपस्थित प्रसारमाध्यमांनी केला. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. मग इतके माजी नगरसेवक कशाला असा सवाल प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी केला. त्यावर आम्ही महायुती म्हणूनच लढू आता महायुती आणखी मजबूत झाली आहे असे शिंदे म्हणाले.