scorecardresearch

२०२४ ला लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार? उद्धव ठाकरे म्हणाले…

“देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी…”

uddhav thackeray
उद्धव ठाकरे ( शिवसेना फेसबूक छायाचित्र )

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी अलीकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं होतं. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहे, असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता संजय राऊतांनी सांगितलं, “याबाबत आता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. पण, उद्धव ठाकरे हे एक उत्तर चेहरा आहेत. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू… आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो,” असं विधान संजय राऊतांनी केलं होतं.

हेही वाचा : देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याची तक्रार देणाऱ्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल – जयंत पाटील

“…त्या खोलात जाण्याची गरज नाही”

याबाबत आता उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “माझ्या मनात असं कोणतंही स्वप्न नाही. स्वप्नात रंगणारा आणि दंगणारा मी नाही. जी जबाबदारी येते ती पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. कसं ते पद स्वीकारावं लागलं, त्या खोलात जाण्याची गरज नाही. मात्र, असं काहीही माझ्या मनात नाही. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी खांद्यावर घेणं गरजेचं आहे,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

हेही वाचा : “आमच्या पक्षात या नाहीतर तुरुंगात जा”हे भाजपाचं धोरण! उद्धव ठाकरे आक्रमक

“या धाडी सूडात येत नाही का?”

‘खूप आम्हाला लोकांनी त्रास दिला. त्या सगळ्यांचा आम्ही बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही सर्वांना माफ केलं,’ असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. याबद्दल विचारलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं, “त्यावर मी काय बोलू. त्यांच्याबरोबर गेलेले नाही, असं राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक, अनिल परब यांच्यावर सुरु असलेल्या धाडी, या सूडात येत नाही का? सूडाने पेटून तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत आहात.”

“लाळघोटेपणाने परत त्यांच्या मांडीला मांडी…”

“खेडच्या सभेत सांगितलं होतं, कुटुंबच्या कुटुंब टीका करून बदनाम करायची, उद्ध्वस्त करायची. तरीही ती उद्ध्वस्त झाली नाहीतर, लाळघोटेपणाने परत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हे मेघालयात दिसलं आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 13:12 IST