केंद्र सरकारने अचानक लॉकडाउनची घोषणा केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेच लॉकडाउन झाला. त्यावरून अनेक राज्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पण आता केंद्र सरकार सारं काही खुलं करा, असं सांगत असतानाही महाराष्ट्रात मात्र त्याला फार प्रतिसाद दिसत नाही. यामागचा विचार काय? असा प्रश्न ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. “मला खलनायक ठरवलं तरीही चालेल, पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही’, असं रोखठोक उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.

आणखी वाचा- लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष येणार – उद्धव ठाकरे

लोकसत्ताचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा नरिमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये दिमाखात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २०२० मधील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज असणाऱ्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ वार्षिकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विशेष संवाद साधला.

लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष येणार – उद्धव ठाकरे

गिरीश कुबेर यांनी अनलॉकसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. आता हळूहळू केंद्र सरकारने लॉकडाउनच्या अटी शिथिल करणं सुरू केलं. पण माझ्या राज्यात मी कोणतेही निर्णय पटापट घेणार नाही. कोणताही निर्णय घेताना तो निर्णय कसा बरोबर आहे, हे आमचं सरकार जनतेला पटवून देईल. पण कितीही झालं तरी मी माझ्या जनतेवर निर्णय पटापट लादणार नाही. रेल्वे किंवा चित्रपटगृहाबाबत निर्णय घेण्यास उशीर लागला किंवा मला त्यामुळे खलनायक ठरवण्यात आलं तरीही चालेल पण मी घाईघाईने निर्णय घेणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ताच्या व्यासपीठावर मांडली.