मुंबई: रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या असून त्यामुळे रेल्वेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगतच्या झोपड्या हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हार्बर मार्गावरील वडाळा – गुरूतेग बहादूर नगर स्थानकांदरम्यानच्या रेल्वे मार्गालगतची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
वडाळा – जीटीबी स्थानकादरम्यान डाऊन रेल्वेमार्गानजिक झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्याची समस्या निर्माण झाली होती. तसेच, रेल्वेच्या हद्दीत अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या असून रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्याचे ढिग साचले होते. यासर्व बाबी लक्षात घेऊन शनिवारी मध्य रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या मदतीने अनधिकृत झोपड्या हटवल्या.
तसेच २६ नोव्हेंबर रोजी चुनाभट्टी आणि जीटीबी नगर दरम्यान १४० छोटी दुकाने आणि २५ झोपड्यांसह १६५ अतिक्रमणे हटवण्यात आली. जुईनगर आणि सानपाडा स्थानकांदरम्यान अशाच प्रकारच्या मोहिमेत १५ अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली.