|| प्रसाद रावकर

कायमस्वरूपी रोषणाई; ‘लेझर शो’द्वारे चळवळीचा इतिहास जिवंत

मुंबई : केवळ देशविदेशातील पर्यटकच नव्हे, तर चक्क मुंबईकरांनीही पाठ फिरविल्यामुळे विस्मृतीत जाण्याच्या बेतात असलेल्या दादरच्या शिवाजी पार्क येथील ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालना’ला झळाळी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने या दालनाच्या इमारतीवर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘लेझर शो’च्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याच्या विरोधातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. या चळवळीत १०६ जण हुतात्मा झाले. त्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला १ मे २०१० रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून महापालिकेने दादरच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक पालिका जलतरण तलावाजवळ ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन’ उभारले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ चित्र आणि शिल्परूपाने जिवंत करण्याचा प्रयत्न पालिकेने दालनाच्या माध्यमातून केला. दालनाच्या तळघरात चळवळीशी संबंधित छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलकांचा समावेश आहे, तर तळमजल्यावर चळवळीत सहभागी नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी आणि मातीचे कलश, भारतमातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती मांडण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्पे, तसेच गड-किल्ले, लेण्या, देवस्थान, पर्यटनस्थळे आदींची छायाचित्रे पाहता येतात.

हे स्मृती दालन मुंबईकरांच्या विस्मृतीत जाऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेला दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने दालनाची डागडुजी, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई महापालिका मुख्यालयाप्रमाणेच स्मृती दालनाच्या इमारतीलाही रंगीबेरंगी दिव्यांची कायमस्वरूपी रोषणाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘लेझर शो’च्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जेमतेम दोनशे पर्यटक

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च करून पालिकेने हे स्मृती दालन उभारले. मात्र पर्यटकांनी या स्मृती दालनाकडे पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून येते. या दालनाला सोमवार ते शुक्रवारदरम्यान सरासरी २०, शनिवारी ४५, तर रविवारी ८० व्यक्ती भेट देत आहेत.

येत्या १ मे २०२० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दालनाची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेच मुख्यालयाप्रमाणेच याही इमारतीला कायमस्वरूपी रोषणाई करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी-उत्तर