scorecardresearch

वीकेण्ड विरंगुळा : ‘वाघाचे पंजे’- शिवसेनेच्या वाटचालीचा वेध

‘नवचैतन्य प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

shivsena, iftar party
राष्ट्रीय मुस्लिम मंचाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.

 

मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास शिवसेनेखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. मराठी माणसांच्या हक्कांसाठी असे बिरुद घेऊन सुरुवातीला मुंबई व ठाणे परिसरात असलेली शिवसेना पुढे राज्यभरात फोफावली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या खंद्या शिलेदारांनी शिवसेना महाराष्ट्रात रुजविली. विविध वाद आणि शिवसेना किंवा शिवसेना व राजकारणातील बदललेल्या भूमिका, शिवसेनेच्या कामाची पद्धत, शिवसेनेवर होणारे आरोप-प्रत्यारोप असे काहीही असले तरी महाराष्ट्रात शिवसेनेला वगळून राजकारण करता येणार नाही, असे स्थान शिवसेनेने निर्माण केले आहे. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने डॉ. विजय ढवळे (ओटावा-कॅनडा) यांनी ‘वाघाचे पंजे’ या ग्रंथात शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. ‘नवचैतन्य प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून या वेळी शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते, उपनेते व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराथी अशा चार भाषांमध्ये हे पुस्तक एकाच वेळी प्रकाशित होणार आहे.

  • कधी- शनिवार, १८ जून २०१६
  • कुठे- हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेंटल, अंधेरी-कुर्ला रस्ता, अंधेरी (पूर्व)
  • केव्हा-सायंकाळी साडेसहा वाजता

 

आहार आणि स्वास्थ्य

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणसांची जीवनपद्धत/जीवनशैली बदलली आहे. नोकरी/व्यवसायाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे वेळी-अवेळी जेवण किंवा पोट भरण्यासाठी म्हणून ‘फास्ट फूड’ खाणे किंवा ‘कोल्ड ड्रिंक’ पिऊन पोट भरणे सर्वमान्य झाले आहे. याचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम काही जणांच्या बाबतीत लगेच तर काही जणांच्या बाबतीत दीर्घ कालावधीनंतर जाणवायला लागला आहे. खरे तर आपला भारतीय/महाराष्ट्रीय जेवण किंवा नाष्त्याचे पदार्थ हे परिपूर्ण व सर्व शरीराच्या आरोग्यविषयक सर्व गरजा पूर्ण करणारे आहेत. पण बदलत्या काळात तरुण पिढी नेमके हेच विसरत चालली आहे. आपला आहार आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्याचा चांगला व वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. संस्कार भारती संस्थेच्या दादर समिती शाखेतर्फे आयोजित ‘आहार आणि स्वास्थ्य’ या व्याख्यानात डॉ. साधना साठय़े (सहयोगी प्राध्यापिका-आयसीटी-यूडीसीटी) आहार व आरोग्याचा संबंध उलगडून दाखविणार आहेत. कार्यक्रमासाठी श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे.

  • कधी- शनिवार, १८ जून २०१६
  • कुठे- वनिता समाज, मोडक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
  • केव्हा- दुपारी चार वाजता

 

संगीत बैठक

शिवाजी पार्क नागरिक संघातर्फे संगीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पौलमी देशमुख यांचे शास्त्रीय गायन तर रेश्मा श्रीवास्तव यांचे सतारवादन रसिकांना ऐकता येणार आहे. विनोदकुमार मिश्र, तेजोवृष जोशी (तबला), ज्ञानेश्वर सोनावणे (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत.

  • कधी- शनिवार, १८ जून २०१६
  • कुठे- शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)
  • केव्हा- सायंकाळी साडेपाच वाजता.

 

‘चला वाचू या’

वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘व्हिजन’ संस्था आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला वाचू या’ हा आगळा अभिवाचन उपक्रम सुरू केला आहे. लोकांमध्ये उत्तम साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा अभिवाचन चळवळ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मुंबईत प्रभादेवी येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे माजी संचालक रामगोपाल बजाज, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता तांबे, वृत्तनिवेदिका ज्योती अंबेकर हे मान्यवर या कार्यक्रमात अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अभिवाचनासाठीचे एक कायमस्वरूपी व्यासपीठ तयार झाले आहे.

  • कधी- रविवार, १९ जून २०१६
  • कुठे- पु. ल. देशपांडे कला अकामदी, लघु नाटय़गृह, रवींद्र नाटय़ मंदिर संकुल, प्रभादेवी, दादर (पश्चिम)
  • केव्हा- सकाळी दहा वाजता

 

मॅजिकल पंचम

हिंदी चित्रपट संगीतात आर. डी. बर्मन ऊर्फ पंचमदा यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. उडत्या चाली, पाश्चात्त्य वाद्यांचा वापर करून संगीतबद्ध केलेल्या गाण्यांबरोबरच भारतीय वाद्यांचाही वापर करून हळुवार व शांत गाणी हे त्यांचे वैशिष्टय़. आर. डी. बर्मन यांच्या हिंदी गाण्यांच्या स्मरणरंजनाचा आनंद रसिक श्रोत्यांना घेता येणार आहे. शहा फाऊंडेशन व कॅनव्हास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मॅजिकल पंचम’ या कार्यक्रमात सर्वेश मिश्रा, शैलेजा सुब्रमण्यम, कविता मूर्ती, मिस्तू बर्धन, आलोक काटदरे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजन व निवेदन अनुक्रमे आनंद सहस्रबुद्धे व संदीप पंचवाटकर यांचे आहे.

  • कधी- शुक्रवार, १७ जून २०१६
  • कुठे- शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम)
  • केव्हा – रात्री साडेसात वाजता

 

पंकज उधास यांचा ‘एक एहसास’

‘चुपके चुपके’, ‘जिये तो जिये कैसे’, ‘पीने वालो सुनो’, ‘थोडी थोडी पिया करो’ या व अशा अनेक गझल आणि गायक पंकज उधास यांचे अतूट नाते आहे. उधास यांनी गायलेल्या गझल रसिक श्रोत्यांच्या ओठावर आहेत. भारतीय संगीतात ‘गझल’ लोकप्रिय करण्यात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात पंकज उधास यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याने त्यांना प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केले.  त्यांचे खासगी आल्बमही प्रकाशित झाले आहेत. उधास यांच्या लोकप्रिय गझल आणि चित्रपट गाणी दस्तुरखुद्द त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. द इव्हेंट कंपनी व जिंजर पीआर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक एहसास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरेंट्स असोसिएशन थॅलॅसॅमिक युनिट ट्रस्टच्या निधी संकलनासाठी हा कार्यक्रम होणार आहे. या ट्रस्टने थॅलेसॅमिया झालेल्या काही मुलांना दत्तक घेतले असून या मुलांवर विनामूल्य वैद्यकीय उपचार व औषधे दिली जातात.

  • कधी- शुक्रवार, १७ जून २०१६
  • कुठे- नेहरू सेंटर, वरळी,
  • केव्हा- सायंकाळी सात वाजता

 

‘स्मार्ट शेती’

भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हाच असून बदलत्या काळानुसार आणि तंत्रानुसार शेती उद्योगात बदल झाले आहेत. सध्याचे युग माहिती-तंत्रज्ञानाच्या महास्फोटाचे व स्मार्टनेसचे आहे. भंडारी मंडळ गोरेगाव परिसर या संस्थेने आधुनिक व बदलत्या काळाचा विचार करून ‘स्मार्ट शेती’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले आहे. कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती आणि ग्रामोद्योगाच्या आधारे स्वावलंबी व्हावे आणि आनंदी जीवन जगावे यासाठी एकटय़ाने काम न करता सामूहिक प्रयत्न करावेत. या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित केले आहे.

  • कधी- रविवार, १९ जून २०१६
  • कुठे- भंडारी जिमखाना, मोतीलाल नगर क्रमांक-१, गोरेगाव (पश्चिम)
  • केव्हा- दुपारी चार वाजता

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-06-2016 at 04:08 IST