करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता 

मुंबई : करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला केले आहे. पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सूरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. राज्यातील करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण किंवा चाचणी सकारात्मक येण्याचा दर १.५९ इतका आहे. मुंबई व पुण्यात हा दर सरासरीहून खूप अधिक आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के, ठाण्यात २७.९२ टक्के, रायगड जिल्ह्यात १८.५२ टक्के तर पालघर जिल्ह्यात ६८.७५ टक्के इतकी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील करोना रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाने रुग्णसंख्या आणि अन्य तपशील बैठकीत सादर केला. राज्यात सध्या केवळ एक रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) असून १८ रुग्ण रुग्णालयात प्राणवायू शय्येवर आहेत. रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी करोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वानी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मुखपट्टीचा वापर करणे आणि लस घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सध्या १८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के नागरिकांना करोना लशीची एक मात्रा देण्यात आली आहे. सध्या करोना चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.