आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू

मुंबई : पंधरा ते अठरा वयोगटातील किशोरवयीनांच्या लसीकरणाला देशभरात ३ जानेवारीपासून सुरुवात होत असून मुंबई महापालिकेनेही त्यासाठी तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. २००७ पूर्वी जन्मलेल्या बालकांना लसीकरणासाठी शनिवार १ जानेवारीपासून नोंदणी करता येणार आहे.  गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभरात करोना प्रतिबंधात्मक लस प्रौढांना देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा टप्पाही सुरू झाला व त्यातही बहुतांश नागरिकांचे लसीकरण आता पूर्ण होत आले आहे. त्यापुढील टप्पा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीनांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

 मुंबईत १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९ लाख बालके असून त्यांना १ जानेवारीपासून स्वत:च्या मोबाइलवरून लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल. तसेच, लसीकरण केंद्रांवर जाऊनही नोंदणी करता येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ठरवलेल्या लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लशीचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. त्याचबरोबर ज्या केंद्रांवर स्वतंत्र कक्ष सुरू करणे शक्य नसेल तेथे या वयोगटासाठी स्वतंत्र रांग करण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे. पालिकेने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूकही केली आहे.  ९ जम्बो करोना केंद्रात लसीकरणाची सोय किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने मुंबईतील नऊ करोना केंद्रात लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

महाविद्यालये, शाळांजवळच केंद्र

सुरुवातीला शाळा, महाविद्यालयांमध्ये लसीकरण करण्याचे नियोजन पालिकेने केले होते. परंतु प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने हा प्रस्ताव रद्द केला आहे. विभागातील शाळा आणि महाविद्यालयांमधील लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांवर पालिकेने सोपविली आहे. त्यामुळे आता शाळा आणि महाविद्यालयांशी याबाबत शिक्षण विभागाने संपर्क साधण्यास सुरुवात केली असून जवळील लसीकरण केंद्राची माहिती दिली जात आहे.

विभाग पालिका वॉर्ड लसीकरण केंद्र

  • कुलाबा, मशीद बंदर, मुंबादेवी, गिरगाव, ग्रॅंटरोड, भायखळापर्यंतच्या परिसरासाठी- भायखळा रिचर्डस अँड क्रुडास
  • नायगाव, शिवडी, सायन, चुनाभट्टी, मानखुर्द, चेंबूर – सोमय्या जम्बो करोना केंद्र, चुनाभट्टी
  •   लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी – वरळी एनएससीआय जम्बो करोना केंद्र
  •    वांद्रे, सांताक्रूझ, खार, अंधेरी, विलेपार्ले पूर्व भाग  बीकेसी जम्बो करोना  केंद्र
  • अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी पश्चिम भाग, गोरेगाव – नेस्को जम्बो करोना केंद्र, गोरेगाव
  • मालाड, कांदिवली- मालाड जम्बो कोविड केंद्र
  • बोरिवली, दहिसर – दहिसर जम्बो कोविड केंद्र
  • घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप- क्रॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रीव्हस कोविड केंद्र कांजूरमार्ग
  • मुलुंड- रिचर्डस अ‍ॅण्ड क्रुडास कोविड केंद्र मुलुंड

सव्वा कोटी मात्रा

 मुंबईला आतापर्यंत लसीकरण कार्यक्रमांतर्गत १ कोटी २० लाख ६५ हजार ८३० लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी ९९ लाख २४ हजार ७२१ लाभार्थ्यांना (१०७ टक्के) पहिली मात्रा व ७९ लाख १७ हजार ७०३ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा (८६ टक्के) देण्यात आली आहे.