प्रस्ताव बारगळला, किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालयांजवळ केंद्रे
मुंबई : महाविद्यालये आणि शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने अखेर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळा आणि महाविद्यालयांजवळच्या लसीकरण केंद्रांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ३ जानेवारीपासून १५ ते १८ या किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. शहरात या वयोगटातील सुमारे नऊ लाख मुले आहेत. एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात लसीकरण सुरू करण्याकरिता पालिकेने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरण करण्याचे ठरविले होते. या दृष्टीने जास्तीत जास्त बालकांची संख्या असलेल्या महाविद्यालयांची यादीही पालिकेने तयार केली होती. तसेच या महाविद्यालयांनुसार यादी देऊन सहकार्य करण्याची मागणी पालिकेने मुंबई विद्यापीठाकडे केली होती.
महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबीर भरविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका याचेही नियोजन करण्यात आले होते. परंतु काही खासगी रुग्णालये आणि शाळांमध्ये लसीकरण करण्यास प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच लसीकरण करण्याची जबाबदारीही महाविद्यालये घेऊ इच्छित नाहीत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे भरविण्याचे पालिकेचे नियोजन बारगळले आहे. यावर उपाय म्हणून आता महाविद्यालये किंवा शाळांजवळच्या लसीकरण केंद्रांची यादी पालिकेने तयार केली आहे. या लसीकरण केंद्रांमधील उपलब्ध आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून येथेच लसीकरण सुविधा उपलब्ध केली जाईल.
‘केंद्राची नियमावली आली असून यानुसार ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांजवळच्या लसीकरण केंद्रांवर ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. जेणेकरून शाळेत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस घेणे सोयीचे होईल. याची माहितीही महाविद्यालयांमध्ये दिली जाईल,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनच्या अडीच लाख मात्रा उपलब्ध
मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यासाठी मान्यता दिली असून मुंबईत या लशीचा सुमारे अडीच लाख मात्रांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण सुरू करण्यासाठी सध्या कोणतीही अडचण नाही, असे काकाणी यांनी सांगितले.
वर्धक मात्रेसाठी सुमारे तीन लाख कर्मचारी
आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील सुमारे तीन लाख कर्मचारी १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या मात्रेनंतर किमान नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण करण्याची अट घातली आहे. या वयोगटाचे लसीकरण मार्चमध्ये सुरू झाल्यामुळे यातील फार कमी जण लसीकरणासाठी लगेचच पात्र असणार आहेत. त्यामुळे यांची गर्दी होण्याची शक्यता कमी आहे, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.