५ आणि ६ ऑगस्टला पहिले प्रयोग

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने केलेल्या प्रयत्नांतून  नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर रसिकांच्या सेवेसाठी खुल्या झालेल्या माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात पुन्हा एकदा नाट्यप्रयोगांना दिमाखात सुरूवात होणार आहे. ‘व्हॅक्युम क्लीनर’ आणि ‘एका लग्नाची गोष्ट’ या दोन नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात रंगणार असल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे. करोनाकाळात बंद झालेले यशवंत नाट्यगृह पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मे महिन्यापासून दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई: इन्स्टाग्रामवरील मित्राकडून अल्पवयीन मुलीचे मॉर्फ छायाचित्र प्रसारित, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ जूनला या नाट्यगृहात नाट्य परिषदेचा कार्यक्रमही पार पडला. नूतनीकरण पूर्ण झालेले हे नाट्यगृह १ ऑगस्टपासून प्रेक्षकांसाठी खुले होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी जाहीर केले होते. प्रयोगासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. आता शनिवार, ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाचा प्रयोग यशवंत नाट्यगृहात रंगणार आहे. तर रविवार, ६ ऑगस्ट रोजी अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड – मेढेकर यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग यशवंत नाट्यगृहात होणार आहे. तब्बल चार वर्षांनी या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दोन्ही नाटकांच्या प्रयोगांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णयही निर्मात्यांनी घेतला आहे.