मुंबईः वक्रांगी टेक्नॉलॉजीचे दिनेश नंदवाना यांच्या अंधेरी येथील घरी ईडीची शोधमोहीम सुरू असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. दरम्यान, ईडीच्या जालंधर कक्षाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ११.३०च्या सुमारास त्याच्या घरी शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबत ईडीने स्थानिक पोलिसांनाही माहिती दिली होती.

शोधमोहीम सुरू असताना दिनेश नंदवाना यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सध्या, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केलेली नाही, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी या घटनेबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वक्रांगी टेक्नॉलॉजीने बीएसईला पत्राद्वारे प्रवर्तक नंदवाला यांच्या निधनाची माहिती दिली. आम्हाला कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की, आमचे प्रवर्तक दिनेश नंदवाना (६२) यांचे ३१ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. दिनेश नंदवाना हे पहिल्या पिढीतील उद्योजक होते. कंपनीच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी कंपनीला प्रगतीच्या नवीन टप्प्यावर नेले, असे कंपनीने बीएसईला पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.