राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरु झाला आहे. युतीबरोबरच आघाडीनेही आपल्या प्रचाराचे नारळ फोडले आहेत. दरम्यान, कोल्हापूरातील युतीच्या पहिल्याच प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी टार्गेट केले. वंचितांची आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीला सध्या घरघर लागली आहे. शिवसेना-भाजपा युती होत नाही हे गृहीत धरुन त्यांनी अनेक घोषणा केल्या केल्या त्यांचे सत्तावाटपही सुरु झाले. मात्र, युतीची घोषणा होताच या दोघांचेही अवसान गळाले आहे. त्यांच्या कमरेवरच्या नाड्याही ढिल्या पडल्या आहेत त्यांचे उमेदवार निवडणूक सोडून मैदान सोडून पळू लागले आहेत. त्यामुळे विरोधक कोणी आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वंचितांच्या आघाडीबाबत तर न बोललेलेच बरे, या निवडणुकांपुरत्या निर्माण झालेल्या छत्र्या आहेत. निकालानंतर त्याही अदृश्य झालेल्या दिसतील, अशा शब्दांत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवरही कठोर शब्दांत टीका केली आहे.

ठाकरे म्हणतात, आपल्या इतक्या मोठ्या देशात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा सामना करताना जर मजबूत सरकार नसेल तर देश कोसळून पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी कौतुक केले, तसेच मोदींच्या तोडीचा एकतरी नेता महाआघाडीत आहे का? असा सवाल विचारताना महाआघाडीतल्या नेत्यांची अवस्था कसायाच्या दारात उभ्या केलेल्या बैलासारखी झाली असून ते देश काय सांभाळणार असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या महाआघाडीची कराड येथे झालेल्या पहिल्या प्रचार सभेची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. कुणी कॉलर उडवत भाषण करतयं तर कुणी रस्त्यात नाचतयं अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना टार्गेट केले. दानवेंच्या मराठवाड्यात, फडणवीसांच्या विदर्भात, मुंबई-कोकणातही युतीची हवा आहे तसेच यंदा बारामतीही आम्हीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात ४८ पैकी ४५ जागा आम्ही नक्कीच जिंकू, विरोधकांसाठी औषधाला म्हणून ३ जागा ठेवत आहोत, असे उद्धव यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit aaghadi is only made for election says shivsena
First published on: 26-03-2019 at 08:53 IST