मुंबई, ठाणे : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी संपूर्ण राज्याचा आसमंत श्रीराममय झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी आज, रविवारी आणि सोमवारी महाआरती, रथयात्रा, यज्ञ, गीतरामायणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ठाण्यातील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर श्रीराम चरित्रावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. दादर येथे ८० फूट उंचीचा श्रीरामांचा कटआऊट आणि अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदार-खासदार, पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
हेही वाचा >>> एकनाथ शिंदे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, कारण स्पष्ट करत म्हणाले…
मालाड येथे रविवारी रामलीला आणि सोमवारी सकाळी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. ओशिवरा येथे संजय पांडे यांच्या पुढाकाराने श्रीराम मंदिराची ५० फूट प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रविवारपासून तीन दिवस रामायण, गायत्री महायज्ञ, महाआरती आणि रामधूनसह विविध कार्यक्रम होणार आहेत. राम मंदिर उभारणीचा आनंद दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांनी केले आहे.
संपूर्ण ठाणे शहर आणि आसपासचा परिसर श्रीराममय झाला आहे. शहरातील दुकानांच्या प्रवेशद्वारांवर शनिवारी श्रीरामाचे आणि श्रीराम मंदिराचे फलक, आकाश कंदील लावण्यात आले. श्रीरामाच्या जयघोषाचे झेंडे, पताके लावून रस्तेही सजवण्यात आले आहेत. ठिकठिकाणी श्रीरामकथेवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. गृहसंकुलांतही श्रीरामाचा जागर सुरू झाल्याचे चित्र आहे. खारकर आळी येथील पोलीस शाळेजवळ श्रीरामांची ३० फूट उंचीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्रीराम आणि श्रीराम मंदिराच्या प्रतिमा असलेले टी-शर्ट्स, साडया, टोप्या, शाली, मोबाइल कव्हर्स यांची धडाक्यात विक्री चालू आहे. ठाणे शहरातील नामांकित मिठाई दुकानांमध्ये ‘राम नामा’चे केसर पेढे दाखल झाले आहेत. डोंबिवलीतील पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदानप्रदान कार्यक्रमात ६२ हजार ५०० पुस्तकांचा वापर करून भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये स्थानक परिसराजवळ या उत्सवानिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा >>> “श्रीरामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य…”, संजय राऊत यांचा भाजपाला टोला
मासुंदा तलावावर रोषणाई
आयोध्यातील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील मासुंदा तलावावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात आला असून या ठिकाणी संपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
बाजारात ‘दिवाळी’
’ मुंबई आणि ठाणे येथील बाजारपेठांमध्ये दिवाळीप्रमाणे पणत्या, रोषणाईच्या साहित्याची दमदार विक्री होत आहे. श्रीरामाचे चित्र किंवा राममंदिराची प्रतिमा किंवा ‘जय श्रीराम’ अशी घोषणा लिहिलेले भगवे ध्वज, टी शर्ट्स, टोप्या, साडया, मोबाईल कव्हर्स यांच्यासह अन्य साहित्याला मोठी मागणी आहे. ’ गृहसंकुले आणि रस्त्यांवर श्रीरामाची प्रतिमा असलेले ध्वज लावण्यात आले आहेत. गृहनिर्माण संस्था, संकुले, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांचे तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी अर्धा दिवस तर राज्य सरकारने पूर्ण दिवस सुटी जाहीर केली असून बँकांसह शेअर बाजार, अन्य आस्थापना, शाळाही बंद राहणार आहेत.