जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याने ‘नावात काय आहे’ असे म्हटले असले तरी नावातच सर्व काही आहे. एखाद्याच्या हाक मारण्याच्या ‘नावा’पासून ते त्याला ‘नाव’ ठेवण्यापर्यंत आपण नावाचा वापर करीत असतो. ही नावे माणसापुरतीच मर्यादित नसून आपल्याकडे पावसालाही अशी विविध ‘नावे’ ठेवण्यात आली आहेत. पावसाला ठेवलेली ही नावे पूर्वापार चालत आलेली आहेत.
आपल्याकडे पावसाची म्हणून जी काही नक्षत्रे आहेत, त्यापैकी काही विशिष्ट नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकऱ्यांनी ही विविध गमतीशीर नावे ठेवली आहेत. पारंपरिक अंदाजानुसार त्या नक्षत्रात ज्या प्रकारे पाऊस पडतो त्यानुसार ही नावे ठेवण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणाले, पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’पाऊस तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ पाऊस असे म्हणतात. आश्लेषा नक्षत्रातील पावसाला ‘आसलकाचा पाऊस’, मघा नक्षत्रातील पावसाला ‘सासू’चा पाऊस, पूर्वा नक्षत्रातील पावसाला ‘सूनां’चा पाऊस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रग्बीचा’ पाऊस तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्ती’चा पाऊस अशी नावे आहेत.
पर्जन्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ठेवण्यात आलेल्या नावांना शास्त्रीय आधार नाही. परंपरेने व पूर्वापार चालत आलेली ही नावे असल्याचे सांगून सोमण म्हणाले, पर्जन्य नक्षत्रे आणि त्याचे वाहन यावरूनही पावसाचा अंदाज बांधण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वापार आहे. सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाला सुरुवात होते. सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस पडतो. बेडूक, म्हैस, हत्ती हे वाहन असेल तर भरपूर पाऊस पडतो तर मोर, गाढव व उंदीर हे वाहन असताना मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हा व मेंढा वाहन असेल तर पाऊस ओढ लावतो. घोडा वाहन असेल तर पर्वत क्षेत्रात पाऊस पडतो, असे समजले जाते. अर्थात पर्जन्य नक्षत्रे आणि त्याची वाहने व त्यावरून पडणाऱ्या पावसाच्या अंदाजाला वैज्ञानिक आधार नाही. ते ठोकताळे असतात. कधी बरोबर येतात तर कधी चुकतात.

यंदाच्या पावसाळ्यातील पर्जन्य नक्षत्रांचा कालावधी आणि त्यांचे वाहन
मृग- ७ ते २० जून-वाहन-बेडूक
आद्र्रा- २१ जून ते ४ जुलै-वाहन-उंदीर
पुनर्वसू- ५ जुलै ते १८ जुलै-वाहन-कोल्हा
पुष्य- १९ जुलै ते १ ऑगस्ट-वाहन-मोर
आश्लेषा- २ ऑगस्ट ते १५ऑगस्ट-वाहन-हत्ती
मघा- १६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट-वाहन-बेडूक
पूर्वा फाल्गुनी- ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर-वाहन-गाढव
उत्तरा फाल्गुनी- १३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर-वाहन-घोडा
हस्त- २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर-वाहन-उंदीर
चित्रा- १०ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर-वाहन-गाढव
स्वाती- २३ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर-वाहन-मेंढा