मुंबई : मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गवाणकर यांच्यावर दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने गंगाराम गवाणकर यांना मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून लोकप्रिय करण्याचे श्रेय गवाणकर यांच्याकडे जाते. ‘महाभारता’तील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवरील भाष्य करणारे ‘वस्त्रहरण’ सारखे फार्सिकल नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘वस्त्रहरण’सारखे कालातीत नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली नाटके लिहिली.

‘वात्रट मेले’ या त्यांच्या नाटकाचेही दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. ऐन उमेदीच्या काळात खडतर संघर्ष अनुभवलेल्या गंगाराम गवाणकर यांनी तत्कालिन रंगकर्मींप्रमाणे चरितार्थासाठी एमटीएनएलमध्ये नोकरी केली आणि नाट्यलेखनाची आवडही जोपासली. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरची आपली वाटचाल सुरू केली. सुरूवातीला बॅकस्टेजवर काम करण्यापासून ते हळूहळू नाट्यलेखक म्हणून ते नावारुपाला आले.

‘वेडी माणसे’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ आदी नाटके त्यांनी लिहिली. विनोदी शैलीत फटकारणारे नाट्यलेखन ही त्यांची खासियत असली तरी ‘दोघी’ हे नाटक काळाच्या पुढचा विचार करून लिहिलेले गंभीर नाटक होते. ‘वन रुम किचन’ हेही त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडे वेगळे नाटक. ‘उष:काल होता होता’ सारख्या नाटकांचे लेखनही त्यांनी केले.

मात्र, ‘वस्त्रहरण’ ही त्यांची अखेरपर्यंत खरी ओळख ठरली. या नाटकाच्या निमित्ताने आलेल्या आठवणी आणि त्या अनुषंगाने आपल्या आयुष्यातील वाटचाल त्यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकातून शब्दबध्द केली. याशिवाय, त्यांनी ‘ऐसपैस’ ही कादंबरी लिहिली होती. तसेच, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘चित्रांगदा’ या नावाने प्रकाशित झाला आहे.

विविधांगी विषयावर लेखन करणारा, वैयक्तिक संघर्षाचे भांडवल न करता साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारा त्यांच्यासारखा मनस्वी लेखक आज हरपला. मालवणी बोलीभाषेला सातासमुद्रापार नेणारा नाटककार हा गंगाराम गवाणकर यांचा लौकिक कायम राहिल.