वाहन हस्तांतरण प्रक्रिया आता सोपी होणार आहे. ऑनलाईन असलेल्या या सेवेत काही कागदपत्रांची छापील प्रत काढल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करुन आरटीओत सादर करावे लागत होते. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी जाणे गरजेचे होते. मात्र आता ही सेवा आधार कार्डशी जोडण्यात येणार असून वाहन मालकाची सर्व माहिती त्वरित आरटीओला उपलब्ध होणार आहे. परिणामी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओत जावे लागणार नाही. एक ते दोन महिन्यात वाहन हस्तांतरण आधार कार्डशी जोडण्याची सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण सेवाही आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यावर कामही सुरु केले आहे. जुन्या वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाहनाचे कायदेशीरपणे आरटीओतून नव्या मालकाच्या नावे हस्तांतरण करायचे झाल्यास स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्जावर घेतले असल्यास त्याचा बोजा उतरविण्याची प्रक्रियाही करावा लागते. त्यातून वाहन नव्या मालकाच्या नावे हस्तांतरित होते. या प्रक्रियेत वाहनांची मूळ कागदपत्र, अर्जावर जुन्या मालकाची संमती आदी बाबी आवश्यक असतात. विक्रेत्याचे घोषणापत्र, विकत घेणाऱ्याचे घोषणापत्र, पी.यु.सी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र लागते. यासाठी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन करणे आणि काही कागदपत्रे डाऊनलोड करण्याची सुविधा परिवहनने उपलब्ध करून दिली असली तरीही कागदपत्रे डाऊनलोड करुन त्याची छापील प्रत काढली जाते आणि त्यावर स्वाक्षरी करुन ती आरटीओत सादर करावी लागतात. त्यामुळे वाहन मालकाचा बराचसा वेळ जातो. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण प्रक्रिया आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन मालकाची सर्व माहिती उपलब्ध होईल. परिणामी स्वाक्षरीचीही गरज लागणार नाही आणि कागदपत्रे पडताळणीसाठी आरटीओतील खेपाही वाचतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle transfer process will be simplified the service will be linked to aadhaar card to save money in rto mumbai print news amy
First published on: 02-09-2022 at 22:09 IST