मुंबई : पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ  मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘बोलविता धनी’, ‘उमज पडेल तर’, ‘राम राम पाव्हणं’ ते गेल्या दशकात गाजलेल्या ‘टिंग्या’ अशा अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवणारी ही ज्येष्ठ अभिनेत्री गेले काही वर्ष आप्त आणि नातेवाईक असूनही वृद्धाश्रमात आयुष्य व्यतीत करीत होती. चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर होते. दादरला मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसूम आणि कुमूद सुखटणकर या भगिनींनी १९४५च्या दरम्यान मराठी चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून भूमिका करायला सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. १९५२ साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ या चित्रपटात काम केले होते. ‘टिंग्या’ हा चित्रपट त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी केला होता. गेल्या दीड वर्षांपासून चित्रा नवाथे मुलुंड येथील वृद्धाश्रमात होत्या. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना जुहू येथील सरला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांची प्रकृती ढासळली. नर्सिंग होममध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.