मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे सोमवारी निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मणिपुरी नृत्यशैलीत पारंगत असलेल्या बेला बोस यांनी साठ-सत्तरच्या दशकांत अनेक हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री वा नृत्यांगना इतपतच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. कवयित्री, उत्तम चित्रकार आणि उत्तम जलतरणपटू असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या बेला बोस त्यांच्या बोलक्या आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय होत्या.
मूळच्या कोलकात्यातील असलेल्या बेला बोस आणि त्यांचे कुटुंब आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईत येऊन स्थायिक झाले. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर एक नृत्यांगना म्हणून बेला यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. ‘मै नशें मै हूँ’ या १९५९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर एका गाण्यातील नृत्यासाठी त्यांची निवड झाली. बंगाली रंगभूमीवर काम करत त्यांनी अभिनय शिकून घेतला. १९६२ साली ‘सौतेला भाई’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा गुरू दत्त यांची नायिका म्हणून मुख्य भूमिका मिळाली. मात्र पुढच्या काळात चरित्र अभिनेत्री म्हणूनच त्या नावारूपाला आल्या. अभिनेत्री हेलन, अरुणा इराणी यांच्याप्रमाणेच नृत्यांगना म्हणूनही त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली. त्यांनी जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या.
गाजलेले चित्रपट
बिमल रॉय दिग्दर्शित ‘बंदिनी’, ‘प्रोफेसर’, ‘शिकार’, ‘आम्रपाली’, ‘उमंग’, ‘दिल और मोहब्बत’, ‘जिंदगी और मौत’ अशा काही चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकांच्या लक्षात राहिल्या. ‘जय संतोषी माँ’ या गाजलेल्या पौराणिक चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकी भूमिकाही गाजली.