scorecardresearch

Premium

ज्येष्ठ साहित्यिक शंन्ना नवरे कालवश

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ विविध साहित्यप्रकारांमधून मराठी मध्यमवर्गीय भावविश्वाचे प्रत्ययकारी शब्दचित्र रेखाटणारे ज्येष्ठ लेखक शंकर नारायण नवरे ..

ज्येष्ठ साहित्यिक शंन्ना नवरे कालवश

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ विविध साहित्यप्रकारांमधून मराठी मध्यमवर्गीय भावविश्वाचे प्रत्ययकारी शब्दचित्र रेखाटणारे ज्येष्ठ लेखक शंकर नारायण नवरे तथा ‘शन्ना’ यांचे बुधवारी सकाळी येथील एका खासगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अंजली, मुलगा अ‍ॅड. अरूण, सून अ‍ॅड. जान्हवी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दत्तनगरमधील स्मशानभूमीत शं. ना. नवरे यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनेक साहित्यिक, कलाकार, चाहते तसेच राजकीय नेते उपस्थित होते.
वृध्दापकाळामुळे ‘शन्नां’ना कफाचा त्रास होत होता. मंगळवारी संध्याकाळी थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीपर्यंत ते नातेवाईकांशी बोलत होते. बुधवारी पहाटे अचानक ते अत्यवस्थ झाले आणि सकाळी सव्वा सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मंगळवारी सकाळी घरातील पूजाअर्चा करून कुटुंबीय आणि आप्तांशी बोलणारे ‘शन्ना’ अचानक निघून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली.
सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून  ‘शन्नां’नी लेखन केले,  पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात. १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली. अलिकडे एका नाटकाचे लिखाण ते करीत होते. पहिला अंक लिहून पूर्ण करून दुसऱ्या अंकाच्या लेखनास त्यांनी प्रारंभही केला होता. मात्र तत्पूर्वीच त्यांची जीवनयात्रा संपली.

शं. ना. नवरेंविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
बहुआयामी लेखकाला महाराष्ट्र मुकला :  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण</strong>
नावीन्याचा शोध घेत चौफेर लेखन करणाऱ्या बहुआयामी लेखकाला महाराष्ट्र मुकला आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, शंना यांनी आपल्या लेखणीतून वैविध्यपूर्ण साहित्याचा खजिनाच चाहत्यांना दिला. कथा, चित्रपट, नाटक, कादंबरी, ललित लेखन, स्तंभ लेखन या सर्वच क्षेत्रात त्यांनी समर्थ मुशाहिरी केली. मध्यमवर्गीय कुटुंबातील सुख-दुख, व्यथा-वेदना मांडल्या. स्वप्नात रंगणारे, जीवनावर सतत प्रेम करणारे व माणसाला जगण्याचे बळ देणारे लेखन हे त्यांचे वैशिष्ठय़ होते.
जगण्यावर प्रेम करणारा लेखक – उपमुख्यमंत्री अजित पवार</strong>
सर्वसामान्य वाचकांच्या जीवनात आनंद पेरणारा आनंदयात्री साहित्यिक गमावला. लिखाणाची साधी, सोपी शैली आणि आनंदाने आयुष्याला सामोरे जाण्याच्या स्वभावामुळे त्यांनी जगण्यावर प्रेम केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंना यांना श्रद्धांजली वाहिली.
* लेखिका माधवी घारपुरे – शन्ना नवरे म्हणजे डोंबिवलीच्या गळ्यातील एक कंठमणी होते. हा मेरूमणी हा आज तुटला याचे अतिव दु:ख होते. श्वास चित्रपटाला यश मिळाल्यानंतर शन्नांनी दिलेले आशीर्वाद आजही लिखाणाला अखंड धबधब्यासारखे प्रोत्साहित करीत आहेत. अपेक्षा ठेऊ नका म्हणजे उपेक्षा होत नाही. वर्णन करताना पुरावा द्या. स्वत:ला मोठे मानू नका अशा काही टिप्समधून त्यांनी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले.

lokrang 8
बहुआयामी कलाकाराचे चित्र-शब्द दर्शन
author sameer gaikwad review saili marathi book
आदले । आत्ताचे : बदनाम गल्ल्यांतले सच्चेपण
pankaj tripathi in loksatta gappa event,
करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन
raj thackrey
गढूळ झालेल्या राजकीय वातावरण साहित्यिकांनी व्यक्त व्हावे; राज ठाकरे

* अभिनेते मोहन जोशी – शन्नांच्या जाण्याने एकदम धक्का बसला. सतत प्रसन्न चेहरा ठेऊन ते समोरच्याला उर्जा द्यायचे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते कधीच वयस्कर वाटले नाहीत. त्यांचे संवाद सुंदर असायचे. स्वत:च्या स्क्रिप्टवर प्रेम करायचे. दोन चित्रपटांच्या निमित्ताने मी त्यांच्या संपर्कात यापूर्वी होतो. लिखाणात मध्ये मध्ये छोटे विनोदी किस्से टाकून ते लिखाण ते फुलवायचे. त्या लिखाण, वाचनाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

* कवी अशोक बागवे – उजळ व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणजे शन्ना नवरे. प्रसन्न मूडमध्ये ते किस्से सांगायचे. १९६० नंतर कथा, कविता, साहित्यात जे बदल घडत गेले ते नवसाहित्य, कथा शन्नांच्या साहित्यातून प्रतिबिंबत होऊ लागले. सचिवालयाला हसत खेळत ठेवण्याचे काम शन्नांनी आपल्या शासकीय नोकरीच्या काळात केले.

* कवी प्रवीण दवणे –
माझे वास्तव्य डोंबिवलीत असल्याने पु. भा. भावे आणि शं. ना. नवरे यांच्या आश्रयाखालीच माझे बालपण गेले. शन्नांच्या कथा काव्यात्मक होत्या. प्रेमकथा त्यांनी विशिष्ट पातळीवर थांबविल्या. त्याच लिखाणाचे संस्कार मनावर झाले. तोच संस्कार जीवनात पुढे मैलाचा दगड ठरला.

* संत साहित्यिक वामन देशपांडे – असे शन्ना परत होणार नाहीत. एवढा महान लेखक. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मानाने मिळणे आवश्यक होते. ते न मिळाल्याची खंत डोंबिवलीकर म्हणून मनाला सतत टोचत राहिल. साहित्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी संचार केला. त्यांनी स्वत:ला कधीच महान ही उपाधी घेतली नाही हे त्यांचे मोठेपण. या लहानपणातून त्यांचे मोठेपण यापुढे आणखी मोठे दिसत राहिल.

 * संगीतकार वसंत आजगावकर – गेले ५५ वर्ष माझा त्यांच्याबरोबर स्नेह होता. ‘आली कुठूनशी कानी टाळ’ हे कवी सोपानदेव चौधरी यांचे गीत त्यांनी मागवून घेऊन मला या या गीताची चाल लावयला लावली. एका नवीन नाटकातील गाण्याबद्दल त्यांच्याशी मंगळवारी सकाळी आपली त्यांच्याशी भेट झाली. गाण लिहून दिल्याबद्दल ठरल. आणि आज ते निघून गेले याचे वाईट वाटते.

* ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर – डोंबिवलीच्या ८० वर्षांच्या वाटचालीतील एक चालताबोलता इतिहास आज काळाआड गेला.
त्यांच्या प्रतिमेमुळे शन्नांची डोंबिवली असे सहज म्हटले जायाचे. प्रत्येक शहराला स्वत:ची प्रतिक असतात जसे कुसुमाग्रजांचे नाशिक, सावरकरांचे भुगूर तसेच डोंबिवलीचे शन्ना हे एक शहराचे वैभव होते.

* उपायुक्त संजय घरत – ‘शन्ना’ हे गंगोत्रीच्या निर्मळ झऱ्यासारखा एक आनंददायी झरा होता. ते स्वत: आनंदी, प्रसन्न राहत आणि दुसऱ्यानेही तेवढेच आनंदी राहावे. त्याने तसे वागावे यासाठी संदेश देत असत. साहित्य विश्वातील त्यांची भ्रमंती, तमाम समाज मनाला त्यांनी दिलेला विचार नक्कीच मौलिक ठरला आहे. पु. भा. भावे यांच्यानंतर जुन्या डोंबिवलीतील साहित्य विश्वाचा शन्ना हे एक दुवा होते. त्यांचे चिरंतन स्मरण डोंबिवलीकरांना राहिल म्हणून त्यांचे चाहते, पालिका प्रशासन यांच्या माध्यमातून एखादे कार्य उभे राहिल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत.

* लेखक आनंद महसवेकर – शन्ना डोंबिवलीचा दीपस्तंभ होते. नव्या पीढीचे ते मार्गदर्शक होते. साहित्य विश्वातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे हसरे व्यक्तिमत्व सतत दुसऱ्याला उर्जा देत असे. कोणत्या परिस्थितीत कसे राहावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक पोकळी निर्माण झाली आहे.

* खासदार आनंद परांजपे- शन्नांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे डोंबिवलीत उचित स्मारक व्हावे. ज्यामध्ये त्यांचे समग्र साहित्य लिखीत, माहिती व तंत्रज्ञान साधनांचा उपयोग करून त्यांच्या चाहत्यांबरोबर नवीन पीढीला सहज उपलब्ध होईल. ई-बुक्स, ग्रंथालयांच्या माध्यमातून शन्नांचे साहित्य घराघरात पोहचविणे, विशेषत: नवतरूण वर्गाला त्याकडे आकर्षित करणे ही त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

* प्रा. शुक्राचार्य गायकवाड – नवलेखकाच्या लिखाणातील दोष ते तात्काळ शोधून त्याला ते दुरूस्त करण्यास भाग पाडत. नवलेखकाला ते शुध्दलेखनावर भर देण्याच्या सूचना करीत. शिक्षक भेटला तर विद्यार्थ्यांना काय शिकवा याचे ते मौलिक मार्गदर्शन करीत असत. ते साहित्यिक होते पण त्याचबरोबर एक उत्तम शिक्षक होते.

* कार्यवाह दीपक करंजीकर – सुगंधाची भाषा फुलाला नसते त्याला अबोली म्हणतात हे शन्नांनी शिकवले. एखादा विषय समंजसपणे पटवून देण्याचे त्यांचे कौशल्य होते. अशी माणसे निर्माण होण्यास खूप वर्ष जावी लागतात. त्या प्रवाहातील शन्ना एक होते. भावे यांच्या नंतर साहित्य विश्वातील डोंबिवलीतील एक महत्वाचा तारा निखळून पडला आहे.

साहित्य कोलाज
शन्ना-डे
लोकसत्ताच्या रविवार पुरवणीतील लेखांचं हे संकलन. या सदरातून वाचकांशी संवाद साधताना शन्नांनी आपला साहित्यिकाचा बाज बाजूला ठेवला आणि सामान्य माणसाच्या भूमिकेतून वाचकांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांचं हे सदर लोकसत्ताच्या लाखो वाचकांना थेट भिडलं. चित्रविचित्र आणि मनोरंजक हकीगतींचा खजिना शन्नांकडे आहे, हे या लेखनानं नव्याने सिद्ध केलं.

ओली सुकी
शन्ना यांच्या आठवणींच्या खजिन्यात अनेक रम्य स्मृतींचा साठा होता. लोकसत्ताच्या वाचकांपुढे हा खजिना त्यांनी याच नावाच्या रविवारच्या सदरातून खुला केला.

अघळ पघळ
वेगवेगळ्या व्यक्तींचा सहवास, त्यांच्या आठवणी, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर अलवारपणे उलगडणारं हे पुस्तक. शन्नांना भेटलेले पु. भा. भावे, केशवराव कोठावळे, गंगाधर गाडगीळ, काशीनाथ घाणेकर या पुस्तकातून वाचकांसमोर येतात.. त्यांचे पहिले पुस्तक, पहिले नाटक, यांच्या आठवणीही आहेत, आणि शन्नांच्या आवडत्या डोंबिवलीसोबत जुळलेल्या नाजूक स्नेहभावाचे हळुवार धागे त्यांनी भावुकतेने गुंफले आहेत..

आनंदाचं झाड
कुरूप वास्तवाला सामोरं न जाता, सदैव कल्पनाविश्वात रमणाऱ्या आणि त्या कल्पनेतल्या आनंदाकडे पाहात आनंदी जीवन जगणाऱ्या प्रेमळ कुटुंबाची हृद्य कहाणी..

अट्टाहास

आपल्या पत्नीला मोठी अभिनेत्री बनविण्याच्या अट्टाहासापायी आपल्या आणि पत्नीच्याही आयुष्याचं मातेरं करून घेणाऱ्याची मन सुन्न करणारी कहाणी या कादंबरीत आहे.

सुरुंग
शिस्तीच्या कुंपणाआडच्या एका संपन्न घरात प्रतिष्ठेच्या बुरख्याआड लपलेल्या कठोर वास्तवाच्या सुरुंगाचा अचानक स्फोट होतो, आणि त्यात सारं घर खाक होऊन जातं. एका भेदक वास्तवाचं प्रक्षोभक कथा- नाटय़ या कादंबरीत ठासून भरलेलं आढळतं.

कौलं
जुन्या डायरीवजा वह्य़ांमधून उलगडणारं एका उमलत्या आयुष्याचं कोमल भावविश्व या कादंबरीत उलगडलं आहे.. वहीतील एखाद्या पावानरील आठवण उलगडताना तिच्या आजुबाजूची सगळीच कौलं चाळवली जातात, आणि त्याचे वेगळेच अर्थ, संदर्भ प्रतीत होत राहतात..

मेणाचे पुतळे
माणसाच्या वेगवेगळ्या भावनांचे सूक्ष्म निरीक्षण या कथासंग्रहात आहे. वृद्धांचे एकाकीपण, प्रेमासाठी केलेल्या त्यागाचं अनोखं रूप, शब्दाला जागणारी माणसं, निर्मळ हृदयाची माणसं, अशी वेगवेगळी माणसं या पुस्तकात भेटतात.

सवरेत्कृष्ठ शन्ना
 मध्यमवर्गीय माणसं, त्यांची मानसिकता, त्यांची जीवनशैली, चाकोरीबद्ध जगणं, नातीगोती, जिव्हाळा, यांचा वेध घेणारं शन्नांचं लेखन या कथासंग्रहात संकलित आहे. त्यांच्या सगळ्याच कथांमध्ये शब्दांच्या वेधकपणाची आगळी चमक दिसते. ते त्यांच्या लिखाणाचं वैशिष्टय़ आणि त्यांचं कसब..

पैठणी
घरातली भावुक नाती, त्यातून एकमेकांशी जुळलेले ऋणानुबंध, थट्टामस्करी, रुसवेफुगवे आणि पुन्हा हसणं-फुलणं.. प्रेम आणि विरह, शन्नांच्या शैलीचा खास स्पर्श असलेला हा कथासंग्रह!

झोपाळा
या पुस्तकात शन्नांचं भावनाप्रधान व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब दिसतं. या कथासंग्रहात सुंदर बायकोला दौलत म्हणून जपणारा नवरा आहे, तसाच आपल्या सुंदर बायकोला स्वतहून रंगमंचावर पाठविणारा नवराही आहे. नवऱ्याच्या पश्चात विधवेचं विषण्ण जिणं जगणारी तरुण विधवा आहे, आणि स्त्रीचा आपल्या उपभोगापुरता वापर करून घेणारा स्वार्थी पुरुषही आहे..

कोवळी वर्षे / बेला
शन्नांच्या सिद्धहस्त लेखनाचा हा कथासंग्रह म्हणजे आरसा आहे. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका सुट्टीच्या दिवसाचं आपलं वाटावं असं रसाळ वर्णन यात आहे, आणि वेश्यावस्तीतल्या गजबजलेल्या संध्याकाळचं सूक्ष्म निरीक्षणही आहे..

तिन्हीसांजा
आयुष्याच्या उत्तररंगात प्रवेश केलेल्या नायक नायिकांच्या भावभावनांचे तरल चित्रण आणि उत्तरायुष्यातील अनेक छटांचे मिश्रण या कथासंग्रहात दिसते. मुलंमुली शिकली, कमावती झाली, मोठी झाली आणि आपल्या विश्वात रमली.. अशा वेळी, आईवडिलांच्या जबाबदारीतून मोकळं झालेल्यांना येणाऱ्या अनुभवांचं कथन या पुस्तकात आहे. निवृत्तीनंतर घरात लुडबूड न करता, त्रयस्थपणे राहून स्वतला वेगळ्या विश्वात कसं सामावून घेता येईल, हे सांगणाऱ्या कथाही या संग्रहात आहेत.

संवाद/ नो प्रॉब्लेम
केवळ संवादशैलीतील मराठीतील बहुधा पहिलं लेखन, आणि आयुषअयातील कोणत्याही समस्येकडे सकारात्मकपणे पाहिल्यानंतर त्या सोप्या कशा होतात, याचं कथन करणारं लेखन. या कथासंग्रहात दिसतं. असं जगणं जमलं, की आयुष्य आनंदात जातं, हा अनुभवही हा कथासंग्रह सांगून जातो..

मनातले कंस/ एकमेक
या पुस्तकातील कथा मनातले कंस आणि एकमेक अशा दोन भागांत विभागलेल्या आहेत. मनापासून जे बोलायचं असतं, ते बहुधा मनातल्या कंसातच राहून जातं. ते कंस मोडले, तर समोरच्याचं मन दुखावेल असं वाटत राहातं, आणि मन मोकळं होतच नाही. अशा घुसमटलेल्या मनानं वावरणाऱ्या काहींच्या या कथा. एकमेकमध्ये मात्र, माणसामाणसांतील संबंधांवर आधारित कथा आहेत.

निवडुंग आणि इंद्रायणी
यातील निवडुंग या कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपटदेखील आला आहे. दुय्यम दर्जाच्या भूमिका करणाऱ्या नटाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट खूप गाजला होता. या पुस्तकातील अनेक कथांना नाटक आणि चित्रपटसृष्टीचीच पाश्र्वभूमी आहे.

याशिवाय :  दिवसेंदिवस (कादंबरी), पर्वणी (विनोदी), खेळीमेळी (नाटक), रंगसावल्या (नाटक), हसतहसत फसवुनी (नाटक), मोरावर चोर (एकांकिका), जनावर (एकांकिका), शहाणी सकाळ, वर्षांव (नाटक), मला भेट हवी हो (नाटक), दोघांमधले नाते (नाटक), दोन यमांचा फार्स (एकांकिका), काला पहाड (एकांकिका), डाग (एकांकिका), मार्ग (एकांकिका), शहाणी सकाळ (नाटक, कादंबरी), सूर राहू दे (नाटक), गुंतता हृदय हे (जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून शन्नांनी लिहिलेले नाटक).

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Veteran marathi writer shankar narayan navare passed away

First published on: 26-09-2013 at 04:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×