ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे शनिवारी रात्री निधन झाले. होनप हे सूर साधना या कार्यक्रमास शनिवारी उपस्थित राहिले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते कार्यक्रम सुरु असतानाच व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत होनप यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. होनप यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी दत्तावरील अनेक गाण्यांना संगीत दिलेले. गायक अजित कडकडे यांनी गायलेले निघालो घेऊन दत्ताची पालखी.. हे गाणे होनप यांनीच संगीतबद्ध केले होते. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी केली होती. निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली”, “स्वामी कृपा कधी करणार” आणि अशी हजारो स्वामी भक्तीपर गीते संगीतबद्द केली होती. ते भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीतरसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीतं, प्रेमगीतं आदींनाही त्यांनी संगीत दिले.
नंदू होनप यांच्या व्हायोलिननं बॉलिवूडवरही गारुड केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या गीतांना त्यांनी व्हायोलिन साथ केली होती. दगाबाज रे… सावन आया है… सुनो ना संगे मरमर… सुन रहा है… या गाण्यांचा त्यात समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2016 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
नंदू होनप हे प्रामुख्याने दत्तावरील भक्तीमय गाण्यांसाठी प्रसिद्ध होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 18-09-2016 at 10:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran muscision and violin player nandu honap passes away