पशुवैद्यकीय दवाखान्यांतील सोनोग्राफी यंत्रांची नोंदणी सक्तीची

राज्यातील सर्व शासकीय, खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, संस्था व महाविद्यालयांमधील सोनोग्राफी यंत्रांची नोंदणी करणे

गर्भलिंग चाचणीचा गैरवापर टाळण्यासाठी निर्णय
राज्यातील सर्व शासकीय, खासगी पशुवैद्यकीय दवाखाने, संस्था व महाविद्यालयांमधील सोनोग्राफी यंत्रांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांतील सोनोग्राफी यंत्रांचा स्त्रियांच्या गर्भलिंग चाचणीसाठी गैरवापर केला जाण्याची शक्यता गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागातील सूत्राकडून सांगण्यात आले.
केंद्राच्या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) १९९४ नुसार सोनाग्राफी यंत्रांची संबंधित समुचित प्राधिकाऱ्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय व खासगी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये वापरात असलेल्या सोनोग्राफी यंत्रांचीही नोंदणी करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात जवळपास अडीच हजार शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यांपैकी चारशे ते पाचशे दवाखान्यांमध्ये पशू-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी सोनोग्राफी यंत्रांचा वापर केला जातो.
त्या सर्व सोनोग्राफी यंत्रांची वा पुढे इतर दवाखान्यांमध्येही वापरल्या जाऊ शकणाऱ्या यंत्रांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये असलेल्या सोनोग्राफी यंत्रांचा स्त्रियांच्या गर्भलिंग चाचणीसाठी गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका स्तरावर तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका क्षेत्रात आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी, यांच्याकडे सोनोग्राफी यंत्रांची नोंदणी करायची आहे. त्यानंतर पुढे संबंधित अधिकाऱ्यांनी या यंत्रांचा फक्त पशू-पक्षी यांच्या उपचारासाठीच वापर होतो किंवा नाही, अथवा त्याचा अन्य कारणासाठी गैरवापर केला जातो का, याची दर तीन महिन्यांनी तपासणी करायची आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Veterinary clinic sonography machines