१६ आजी-माजी नगरसेवक

मुंबईमधील आजी-माजी सुमारे १६ नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले आहेत. काही नगरसेवकांना पक्षांनी उमेदवारी दिली आहे, तर काहींनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत रणशिंग फुंकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १४ आजी-माजी नगरसेवक उतरले होते.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन विठ्ठल लोकरे शिवसेनेत दाखल झाले होते. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या विठ्ठल लोकरे यांना शिवसेनेने मानखुर्द येथून उमेदवारी दिली आहे. तर मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना पक्षाने कलिना मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी वांद्रे पश्चिम, जगदीश अमीन कुट्टी यांनी अंधेरी पूर्व, अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भायखळ्यातून, समाजवादी पार्टीचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी भिवंडी पूर्व येथून, दिलीप लांडे यांनी चांदिवलीमधून, भाजप नगरसेवक पराग शाह यांनी घाटकोपर पूर्व येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माजी नगरसेवक असलेले भाजपचे आमदार अमित साटम, मनीषा चौधरी आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांना अनुक्रमे अंधेरी पश्चिम, दहिसर आणि दिंडोशीतून पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेसने माजी नगरसेवक सुरेश कोपरकर, अजंता यादव, जॉर्ज अब्राहम, शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना मनसेने उमेदवारी देऊन माहीम मतदारसंघात उतरवले आहे.

जात पडताळणीमध्ये नगरसेवकपद गमवावे लागलेले भाजपचे मुरजी पटेल यांनी बंड करीत अंधेरी पूर्व येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूल पटेल यांनीही बंडाचे निशाण फडकवत शुक्रवारी वर्सोवा येथून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. नियाझ वणू यांचे पुत्र, काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनीही बंड करीत गोवंडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.