अनेक निवडणूक कार्यालये शाळांमध्ये; उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनाचा फटका

प्रतिनिधी, मुंबई</p>

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. या वेळी उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात येत असल्याने याचा मोठा मनस्ताप शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.

निवडणूक आयोगाकडून मुंबईतील अनेक ठिकाणी निवडणूक कार्यालये शाळांमध्ये उभारण्यात आली आहेत. उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी २७ सप्टेंबरपासून ही कार्यालये सुरू करण्यात आली. मात्र अनेक पक्षांची उमेदवारी यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाल्याने गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे अर्ज दाखल केले जात असल्याने सर्वच निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. आपल्या विरुद्ध असलेल्या उमेदवाराला आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवार मोठय़ा प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत होते. कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा नेत्यांसोबत होता. याचा मोठा मनस्ताप शाळकरी मुलांना सहन करावा लागत होता.

शाळेच्या वेळेतच उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह आणि गाडय़ाचा ताफा घेऊन निवडणूक कार्यालयात पोहोचत होते. त्यामुळे शाळेच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. परिणामी विद्यार्थ्यांना या गर्दीतून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. चेंबूर नाका परिसरात असलेल्या निवडणूक कार्यालयाबाहेर तर रस्ता निमुळता असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील गेल्या काही दिवसांत मोठा मनस्ताप सहन करावा लागला.