मुंबई : राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) वापरण्यात येणार नसल्याने मतदानांविषयी संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून वारंवार होत आहेत. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मतदार चार मते देणार असल्याने ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करणार नसल्याची भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. आयोगाची भूमिका राजकीय पक्षांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना पुष्टी देणारी आहे. ‘व्हीव्हीपॅट’ वापरणार नसाल तर मतदान मतपत्रिकांवर घ्यावे, जेणेकरून आयोगाच्या पारदर्शकतेवर मतदारांचा विश्वास बसेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.