दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे संकेत
राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये बेकायदा शिक्षकांची भरती झाल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत लेखी प्रश्नोत्तरात दिली आहे. बेकायदा भरतीबद्दल चौकशी सुरू असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या भरतीवर र्निबध घातले असताना ७ हजार २२८ शिक्षकांची भरती करून त्यांना शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावर मान्यता दिल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणले. त्यानंतर शासनस्तरावरून चौकशीची चक्रे फिरू लागली. या संदर्भात विधान परिषदेत मंगळवारी शरद रणपिसे, संजय दत्त, प्रवीण दरेकर, धनंजय मुंडे, हेमंत टकले, सुनील तटकरे, निरंजन डावखरे, आदी सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
राज्यातील सर्व शाळांमध्ये २०११ मध्ये पटपडताळणी केल्यानंतर त्यात मोठय़ा प्रमाणावर बोगस विद्यार्थी असल्याचे आढळून आले. बोगस विद्यार्थी दाखवून शासनाकडून अनुदान लाटणाऱ्या शाळांना धडा शिकविण्यासाठी, ज्या शाळेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दिसली, त्या शाळा बंद करून त्यांतील शिक्षकांच्या सेवाही समाप्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ज्या शाळांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत अनुपस्थिती असेल त्या शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याचे ठरले. अतिरिक्त शिक्षकांचे शंभर टक्के अन्य शाळांमध्ये समायोजन झाल्याशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करायची नाही, असा २ मे २०१२ रोजी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही ७ हजार २२८ शिक्षकांची भरती झाल्याचे उघडकीस आले. त्यासंदर्भात ६२ शिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. शिक्षक भरतीत नियमितता झाली आहे का व त्याबाबत शासनाने काय कारवाई केली अशी विचारणा करण्यात आली होती.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात शिक्षकांच्या भरतीत अनियमितता झाल्याचे मान्य केले आहे. मात्र २ मे २०१२ नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळोवेळी शिक्षकांच्या भरतीवरील बंदीला काही अंशी सूट दिली आहे. २० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार २ मे २०१२ च्या आदेशान्वये लागू केलेले र्निबध उठविण्यात आले असून शिक्षकांच्या भरतीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार झालेल्या शिक्षकांच्या नेमणुकांव्यतिरिक्त भरती झाल्याचे निर्दशनास आले आहे, असे तावडे यांनी सांगितले.
- शिक्षक भरती प्रक्रियेत अनियमिमता आढळून आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे.