मालाड पश्चिमेची जागा राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
उत्तर मुंबईतील विधानसभेच्या सहापैकी चार जागा भाजपकडे, तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक अशी विभागणी आहे. तर इथल्या ४२ नगरसेवकांपैकी २४ भाजपकडे, १२ सेनेकडे तर सहा काँग्रेसकडे आहेत. भाजपने १९७८पासून उत्तर मुंबई पर्यायाने इथल्या सहा विधानसभा मतदारसंघात तळापर्यंत केलेल्या पक्षबांधणाची अंदाज या आकडय़ांवरून यावा. काँग्रेसकडून २००४ला अभिनेता गोविंदा यांना देण्यात आलेली उमेदवारी आणि २००९मध्ये मनसेमुळे संजय निरुपम यांना झालेला मतविभागणीचा फायदा (त्याचेच पडसाद विधानसभा-पालिका निवडणुकीतही उमटले) वगळता हा वर्षांनुवर्षे भाजप-सेनेचाच गड राहिला आहे. इथल्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता जवळपास नाही. उत्सुकता आहे ती फक्त मालाड पश्चिमची. २०१४मध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ कसाबसा राखला. परंतु २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या या एकुलत्या एक मतदारसंघातूनही आघाडी घेतल्याने इथली गणिते बदलण्याची शक्यता आहे.
दहिसर कुणाच्या वाटय़ाला?
मुंबईच्या वेशीवरील दहिसर विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासून सेनेकडे असल्याने त्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. २०१४मध्ये मोदी लाटेत भाजपने येथे चंचुप्रवेश करत सेनेच्या किल्लय़ाला भगदाड पाडले. विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या सेनेतील गटबाजीमुळे भाजपच्या मनीषा चौधरी यांचा विजय सोपा झाल्याचे म्हटले जाते. परंतु, या मतदारसंघातील वाढती गुजराती भाषकांची संख्या आणि मध्यमवर्गीय मराठी मतदाराकडून मोदींची केली जाणारी पाठराखण हेही त्या विजयामागील प्रमुख कारण होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालातही येथील मतदारांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांना भरभरून मते दिली. त्याआधी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी तब्बल ७७ हजार मते घेत विजय मिळवला होता. तर सेनेचे विनोद घोसाळकर यांना ३८ हजार, काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांना २१ हजार, मनसेच्या शुभा राऊळ यांनी १७ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. घोसाळकर आणि चौधरी यांच्या मतातील फरक पाहता भाजप या मतदारसंघावरचा आपला अधिकार सहजासहजी सोडण्यास तयार होणार नाही. म्हणूनच हा मतदारसंघ युतीमधील कुणाच्या वाटय़ाला येतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
समस्या
- धारावीनंतर मुंबईतील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखले जाणारे गणपत पाटील नगर या मतदारसंघात आहे. अनधिकृत बांधकाम, पाणी, वीजचोरी या सगळ्याच प्रश्नांमुळे ही वस्ती चर्चेत असते. या वस्तीचा विकास हा येथील जटिल प्रश्न आहे.
- वाहतूक कोंडीमुळे रहिवासी त्रस्त
- नाल्यात रूपांतर झालेल्या दहिसर नदीचे पुनरुज्जीवन
चारकोप
बोरिवलीखालोखाल भाजपला कायम हात देणारा हा मतदारसंघ. भाजपचे विद्यमान योगेश सागर येथून पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गुजराती, उत्तर भारतीय, मराठी असा विविध भाषक समूह या मतदारसंघात आहे.
समस्या
- म्हाडा वसाहतींच्या विकासाचा प्रश्न
- अपुरा पाणीपुरवठा
- अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी
कांदिवली (पूर्व)
विविध भाषा घटकांमध्ये हा मतदारसंघ विभागला गेला असला तरी त्याचा तोंडवळा गुजरातीबहुल असाच आहे. येथून मैदानात उतरणारे भाजपचे विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्यासाठी ही जमेची बाजू. येथून काँग्रेसकडून नगरसेविका अजंता यादव, राजेंद्र शिरसाट यांची नावे चर्चेत आहेत.
समस्या
- लष्कराच्या दारूगोळा कारखान्याजवळील निवासी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न
- पोईसर नदीच्या विकासाचा प्रश्न
- डीपी रोड विस्ताराचा प्रश्न
मालाड (पश्चिम)
उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या या एकमेव मतदारसंघात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी २० हजार मतांची आघाडी घेतल्याने येथील गणिते बदलून गेली आहेत. अल्पसंख्याकबहुल अशा मालाडमधील मालवणीतून काँग्रेसला एकगठ्ठा मतदान होते. परंतु भाजप येथे मुसंडी मारण्याच्या बेतात असल्याने इथले आमदार असलम शेख यांच्यासमोर खडतर आव्हान उभे राहणार आहे. येथून भाजपकडून विनोद शेलार, शाम अगरवाल, रमेश सिंग ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत.
समस्या
- वाढती अनधिकृत बांधकामे
- अनियंत्रितपणे वाढणाऱ्या वस्त्यांमधील गुन्हेगारीचा चढता आलेख रोखणे
- झोपडपट्टीवासीयांच्या समस्या
- मालाडमधील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी
मागाठाणे
मागाठाण्यातील सातपैकी सहा नगरसेवक सेनेकडे आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ही जागा सेनेने आपल्याकडे राखली. तेव्हा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सेनेकडून शिवबंधन बांधून घेणाऱ्या प्रकाश सुर्वे यांनी सेनेचा येथील विजय प्रशस्त केला होता. या वेळेसही सुर्वे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या तयारीत पडलाच तर मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांच्याकडून मिठाचा खडा पडू शकतो. सेनेकडचा हा मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला यावा यासाठी दरेकर देव पाण्यात घालून बसले आहेत. तर दुसरीकडे तिकीट नाही मिळाले तर प्रकाश सुर्वेनी शिवबंधन तोडलेच म्हणून समजा, असे कार्यकर्ते सांगत फिरत आहेत. मनसेकडून नयन कदम येथून आपले नशीब अजमावण्याच्या प्रयत्नात असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
समस्या
- काजूपाडा, हनुमान नगर, दामू नगर, केतकी पाडा अशा झोपडपट्टी, बैठय़ा घरांची वस्ती असलेल्या मतदारसंघातील रस्ते, पाणी व सोयीसुविधांशी संबंधित प्रश्न
- वन क्षेत्रावर वसलेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा खोळंबलेला प्रश्न.
- अपुरा पाणीपुरवठा
बोरिवली
भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान बोरिवलीतून (१ लाख ५२ हजार) झाले होते. बहुसंख्य गुजराती भाषक, त्या खालोखाल मराठी भाषक असे स्वरूप असलेल्या या मतदारसंघात रा.स्व.संघाचेही काम असल्याने त्याचा फायदा भाजपला येतो. म्हणूनच विनोद तावडे यांनी २०१४मध्ये हा सुरक्षित मतदारसंघ निवडला. बोरिवलीचे वैशिष्टय़ असे की येथील आतापर्यंतचे आमदार राम नाईक, हेमेंद्र मेहता, गोपाळ शेट्टी दररोज न चुकता सकाळी मतदारांना वेळ देत. कालपरवापर्यंत सात ते आठ खात्यांचा कारभार पाहणारे तावडे यांना हा शिरस्ता पाळणे शक्य होत नाही. तरीही ते विजयाबद्दल आश्वस्त आहेत. तावडे यांना या मतदारसंघात आव्हान कोण देणार, हा काँग्रेससमोरील गहन प्रश्न आहे. २०१४मध्येही येथे भाजपचे विनोद तावडे आणि मनसेचे नयन कदम अशीच लढत होती. कदम यांनी या वेळेस मागाठाणेवर लक्ष केंद्रित केल्याने मनसेलाही उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे.
समस्या
- वाढत्या पुनर्विकासामुळे रस्ते, वाहनतळ आदी पायाभूत सुविधांवर येणारा ताण
- वाहतूक कोंडीची समस्या.
- म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न
- गोराई गावाचा विकासाचा प्रश्न
मतदार म्हणतात,
बोरिवलीत उद्यानांच्या विकासापलीकडे जाऊन काम करायला हवे. अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, परंतु गेल्या पाच वर्षांत पदपथांवरील रेलिंगवर आपली छबी झळकावण्यापलीकडे नेत्यांनी कामे केलेली नाहीत. आमदार मतदारसंघात फारसे फिरकत नसल्याने त्यांना प्रश्नांची जाण तरी कुठून येणार? – सागर शिंदे, रहिवासी, गोराई