मुंबई : गेल्या काही दिवसांपासून परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आणि रखडलेल्या निकालांमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विविध विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला सामोरे जाण्याची वेळ आता कलिना संकुलातील संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या (दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांवर आलेली आहे.

संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या (एमएसीजे व एमएपीआर) तृतीय सत्राची परीक्षा २८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही या विभागाचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर चौथ्या सत्राचे परीक्षा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले असून, सदर परीक्षा ९ मे २०२३ पासून सुरू होईल असे सांगण्यात आले आहे. परंतु अद्याप विद्यार्थ्यांना या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व प्रवेशपत्र देण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या विभागात महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील विद्यार्थी शिकत असल्यामुळे, त्यांना प्रवासाचे नियोजन करण्यासाठी परीक्षेच्या वेळापत्रकाची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> दादरमध्ये पेव्हर ब्लॉकने ठेचून एकाची हत्या, एक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संज्ञापन व पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांच्या तृतीय सत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही तांत्रिक अडथळ्यांमुळे निकाल लावण्यास विलंब होत असून, हे सर्व अडथळे दूर करून लवकरात लवकर निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.  चौथ्या सत्राच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही लवकर देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिले आहे.