पालिकेच्या ‘अ’ विभागात मृतांच्या नावाने नोंदणी; पाणी माफिया – अधिकाऱ्यांचे संगनमत
बोगस रहिवाशांच्या नावावर जलजोडणी घेऊन पाण्याची सर्रास विक्री करण्यात माफिया दंग असून कुलाबा परिसरात थेट मृत व्यक्तीच्या नावाने जलजोडणी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करुनही पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नालेसफाई, गटारांमधील गाळ आणि रस्त्याची कामे यापाठोपाठ आता पालिकेकडून जलजोडणीतही घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे.
कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये माधव शिंदे यांनी २००५ मध्ये एक खोली विकत घेतली. ही खोली सुंदराबाई पावलास बलाल यांची होती. जानेवारी २००५ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने ती शिंदे यांना विकून टाकली. पाण्याची समस्या कायम भेडसावत असल्यामुळे शिंदे यांनी पालिका दरबारी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता ते राहात असलेल्या वस्तीमध्ये २०१२ मध्ये ४१ जणांना मिळून एक सामुहिक जलजोडणी दिल्याचे त्यांना कळले. ही जलजोडणी मिळावी यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडे ८ ऑगस्ट २०१२ मध्ये अर्ज करण्यात आला होता. या अर्जामध्ये वस्तीतील ४१ जणांमध्ये सुंदराबाई पावलस बलाल यांचेही नाव होते. बलाल यांचे २००५ मध्येच निधन झालेले असतानाही अर्जामध्ये त्यांच्या नावाचा समावेश करुन बनावट स्वाक्षरीही करण्यात आली होती. या प्रकरणी आपण ‘ए’ विभाग कार्यालयात तक्रार केली. मात्र कुणीच दखल न घेतल्यामुळे अखेर मानव हक्क आयोगाकडे धाव घ्यावी लागली, असे माधव शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत व्यक्तीच्या नावाने जलजोडणी देण्याचा प्रकार पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत घडला आहे. ‘ए’ विभाग कार्यालय दलालांच्या विळख्यात अडकले असून दलालांविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे.
– राहुल नार्वेकर, आमदार

मृताच्या नावाने जलजोडणी दिल्याची तक्रार करण्यात आली असून त्याची शाहनिशा करण्यात येत आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
– किरण दिघावकर सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water connection scam in bmc
First published on: 30-05-2016 at 02:43 IST