महापौरांनी एकदा दिलेल्या शिफारसपत्राचा दाखला देत एम-पूर्व विभाग कार्यालयामधील जल विभागातील अधिकाऱ्यांनी मानखुर्दच्या शिवनेरी परिसरात वारंवार खासगी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे. हे पाणी रहिवाशांच्या मुखी लागले की टँकर माफियांनी त्यावर बक्कळ पैसे कमवले याचा शोध घेण्याची गरज आहे. मात्र या प्रकरणावरुन एम-पूर्व विभागात टँकर माफिया सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.
मानखुर्दमधील शिवनेरी परिसरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत होता. सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे तेथील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा करावा, असे शिफारसपत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता तानाजी वत्रे यांना दिले होते. या पत्राच्या आधारे पालिकेच्या एम-पूर्व विभागा कार्यालयातील जल विभागातील दुय्यम अभियंत्यांनीशिवनेरी परिसरात पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा केला होता.
महापौरांच्या शिफारसपत्राची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्याचाच दाखला देऊन एम-पूर्व विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शिवनेरी परिसरातील रहिवाशांना वारंवार पालिकेच्या एक आणि खासगी दोन टँकरने पिण्याच्या पाणीपुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत १ जानेवारी ते ४ एप्रिल या काळात मुंबईत तबल ४८,१८० टँकरमधून पाणीपुरवठा झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. अपुरा पाणीपुरवठा झालेल्या विभागातील नागरिकांसाठी पालिकेच्या टँकरमधून ९,१८१ फेऱ्या झाल्याचे निष्पन्न झाले होते. उर्वरित तब्बल ३८,९९९ खासगी टँकरमधून पिण्याच्या पाण्याच्या फेऱ्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले होते.

टँकर माफिया पिण्याचे पाणी घेऊन केवळ पालिकेचीच फसवणूक करीत नाही, तर ते जनतेचीही पिळवणूक करीत आहेत. पालिकेकडून १५० रुपयांनी १० हजार लिटर पाणी घेऊन टँकर माफिया ते तब्बल तीन हजार रुपयांना विकत आहेत. टँकर माफिया आणि त्यांना साथ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
मनोज कोटक, गटनेता, भाजप

राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या पत्रांचा आधार घेत एम-पूर्व विभाग कार्यालयातून २०१४-१५ मध्ये टँकर माफिया सर्रास पिण्याच्या पाण्याची लूट करीत होते. पालिकेचे पाणी नाममात्र पैसे देऊन त्यावर बक्कळ पैसे कमविण्याचा धंदा टँकर माफियांनी सुरू केला होता. याबाबत आपण तक्रार केली होती. चौकशीअंती हा प्रकार बंद झाला.
रईस शेख गटनेता, समाजवादी पार्टी</strong>