मुंबई : मुलुंड पश्चिम परिसरात शनिवार, १९ जुलै रोजी बारा तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या कामासाठी शनिवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुलुंडवासियांना पाणी उकळून व गाळून प्यावे लागणार आहे.
मुलुंड (पश्चिम) परिसरातील वीणा नगर येथील योगी हिल मार्गावर प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम प्रस्तावित आहे. शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० या १२ तासांच्या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या भागातील पाणीपुरवठा बंद
मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी.आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १)
पाणी गाळून व उकळून प्यावे
या परिसरातील नागरिकांनी १८ जुलै रोजी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ३ ते ४ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.