रस्ते आणि रेल्वे यांच्या मदतीने वाहतुकीचा प्रश्न सुटता सुटत नाही. एकीकडे रस्ते तोकडे पडत आहेत, तर दुसरीकडे रेल्वेचे जाळे कितीही वाढवले तरीही ‘पिक अवर’चे सराट काही कमी होत नाही. अशा परिस्थितीत मुंबईला गळामिठी बसलेल्या समुद्राकडे पर्याय म्हणून पाहणे हा निश्चितच चांगला विचार ठरू शकतो. पण सरकार वा प्रशासनाने या पर्यायाचे पाणी जोखले आहे काय हा मुद्दा आहे.

जगभर जलवाहतुकीचा पर्याय मोठय़ा प्रमाणात स्वीकारण्यात आला आहे. उदाहणार्थ, रस्ते-रेल्वे यांचे बांधकाम आणि देखभाल-दुरुस्ती यावर बेसुमार खर्च होतो, हे लक्षात घेऊन चीनने जलवाहतुकीकडे मोठय़ा प्रमाणात लक्ष दिले. चीनची भौगोलिक परिस्थिती पाहता तिथले बहुतेक जलमार्ग पूर्व-पश्चिम आहेत. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत चीनकडे आíथक महासत्ता म्हणून सगळे जग पाहते आहे. चीनच्या या अफाट विकासामागे जलवाहतुकीचा वाटा महत्त्वाचा आहे. तिथला अंतर्गत जलमार्गच १ लाख ६३ हजार ९०० किलोमीटरहून अधिक आहे. बोटी, बंदरे, गोद्या किंवा कृत्रिम बंदरे मोठय़ा प्रमाणात बांधून चीनने जलवाहतुकीचा जोरदार विकास साधला आहे. चीनमध्ये जलवाहतुकीचे
प्रमाण ४१ टक्के आहे. तर भारतात हे प्रमाण फक्त ३ टक्केच आहे. जलमार्ग, वाहतूक व्यापार आणि वीजनिर्मिती हा चीनमधला एक फार मोठा भरभराटीस आलेला उद्योग आहे. आपल्याकडे हे कधी होईल हा प्रश्न आहे.
जगाचा हजारो वर्षांचा इतिहास समुद्राभोवती फेऱ्या मारतो आहे. समुद्रमाग्रे जगाला समजून घेणे आणि नवनवे देश-प्रदेश धुंडाळणे, हे मानवी संस्कृतीचे फार मोठे काम. जलमार्ग खुले झाले आणि अनेक नवे देश ओळखीचा चेहरा घेऊन आपल्या समोर आले. पर्यटन आणि व्यापार ही माणसाची दोन प्रमुख कामे समुद्रामुळे शक्य झाली. साहसी दर्यावर्दी आणि जिगरबाज तांडेलांनी समुद्र मार्ग शोधून काढले आणि त्यामुळे जगाचे आणि मानवी जीवनाचे स्वरूप एकदम पालटले. सुएझ कालवा, पनामा कालवा, अटलांटिक महासागर, पॅसिफिक हे जगातले मानाचे समुद्र मार्ग आहेत.
हे सगळे पाहता भारताची स्थिती काय आहे. भारताला सुमारे ७ हजार ५०० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. आपल्याकडे उत्तम प्रतीची केवळ आठच बंदरे आहेत, तर लहान सुमारे १५० बंदरे आहेत. चीनशी बरोबरी करायची झाल्यास भारताला जलवाहतुकीसाठी देशपातळीवर किती प्रयत्न करावे लागतील या विचाराने एखाद्याच्या काळजाचे ‘पाणी पाणी’ होईल.
आता मुंबईविषयी बोलू. सुविख्यात भाऊचा धक्क्याने मुंबईच्या जलवाहतुकीच्या ‘श्री गणेशा’ होतो. भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा हे सगळे जलमार्ग आपल्या नेहमीच्या परिचयाचे. मुंबई अलिबाग हा जलप्रवास दीड तासाचा होतो, तर रस्त्याच्या मार्गाने हा प्रवास साडेतीन तासांचा होतो. वर्सोवा, मढ-मनोरी, गोराई, उत्तन ही समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे, केवळ जलमार्गाने एकमेकांशी जोडलेली आहेत. ही झाली मुंबईची अनेक वर्षांपासून सुरू असलेली पारंपरिक जलवाहतूक. ती अर्थातच अपुरी आहे. सेवासुविधांसह सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही. सध्या भरमसाट वाहने, अर्निबध प्रदूषण, प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुरे रस्ते, हे लक्षात घेता प्रशासनाने रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची आखणी केली आहे. आणि त्यावर कोटय़वधी रुपये खर्च होणार आहेत. हे एका परीने चांगलेच आहे. परंतु रस्ते आणि रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी तातडीने फेरी सेवेचा विचार होणे गरजेचे आहे.
आता काही प्रमाणात ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने या जलवाहतुकीचा विचार केलेले दिसतो. यात भाऊचा धक्का इथे जलवाहतूक सेवा जलवाहतूक सेवा टर्मिनल बांधण्यासाठी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ने कामाची सुरुवात केली आहे. अलिबाग इथल्या मांडवा या गावी असाच एक प्रकल्प ‘महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्डा’ने हाती घेतला आहे. फेरी सेवेला ‘रो-रो’ सव्‍‌र्हिस वेसल (बोट) असे म्हटले जाते. एक ‘रो-रो’ बोट ३०० प्रवासी गाडय़ा आणि शंभर ट्रक घेऊन जाऊ शकते. यामुळे वेळेची तर बचत होईलच त्याचप्रमाणे ऊर्जा वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. भाऊचा धक्का इथला रो-रो टर्मिनल दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे मुंबई गोवा आणि मुंबई कोकण या मार्गावर धावणाऱ्या आणि जड वाहनांना वाहतुकीचा एक नवा पर्याय खुला होईल.
सागरी मार्गासाठी सरकार कोटय़वधी रुपये खर्च करत आहेत आणि ते योग्य आहे. परंतु मुंबईला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा योग्य तो वापर करून थेट जलवाहतुकीचे प्रस्ताव मुंबईकरांसमोर आले पाहिजेत. प्रश्न वाहतूक कोंडी सोडवण्याचा आहे. त्याचप्रमाणे प्रदूषणाचा धोका कसा कमी होत जाईल, हे पाहणेसुद्धा जनतेच्या हिताचे आहे.
सध्या जगभरात जलवाहतूक हा पर्याय स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्याने त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे. सागरी जीवन साखळीला इजा न पोहोचवता नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने जलवाहतूक अधिक जलद आणि सुखकर करण्याचे प्रयत्न परदेशात सुरू आहेत. हल्ली एखादी फायदेशीर गोष्ट लोकांना पटवून सांगितली की, ती पटकन लोकप्रिय होते; लोकांना हवीहवीशी वाटू लागते. जलवाहतुकीचेही अनेक फायदे आहेत. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत प्रकल्पांना लागणाऱ्या कोटय़वधी रुपयांची बचत, कमी इंधनाचा वापर करून अधिक प्रवासी वाहतूक. अतिशय अल्प मनुष्यबळ, स्वस्त प्रवासासह वेळेची बचत आणि आरामदायी प्रवास. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी होणारे लाखो अपघात रोखले जाण्यास मदत होईल आणि प्रदूषणासारख्या समस्यापासून मुंबईकरांची सुटका होईल. मानवनिर्मित संकटांवर निसर्गनिर्मित समुद्रच वाहतुकीचा सक्षम पर्याय आहे. समुद्र ही मुंबईची आत्मधून आहे आणि मुंबईचा ‘हा समुद्र बिलोरी ऐना’ वाहतुकीची नवी नवी रूपे पाहण्यास उत्सुक आहे.