मुंबई : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून भरवण्यात येणाऱ्या ‘फिल्म बाजार’च्या धर्तीवर मुंबईतही वेव्हज परिषदेअंतर्गत ‘वेव्हज बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘वेव्हज बाजार’ अंतर्गत चित्रपट, संगीत, अॅनिमेशन्स, रेडिओ, व्हीएफएक्स अशा विविध विभागातून तब्बल ८०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीपासून संगीत कार्यक्रम, डिजिटल आशयनिर्मिती अशा विविध उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या करारातून ही उलाढाल झाली आहे.

‘वेव्हज बाजार’मध्ये जपान, दक्षिण कोरिया, रशिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अमेरिका अशा विविध २२ देशांतील मोठमोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, मेटा, डिस्ने हॉटस्टार अशा मनोरंजन माध्यमातील नामांकित कंपन्यांचाही यात सहभाग आहे. या ‘वेव्हज बाजार’ अंतर्गत काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम निर्मितीसाठी करार झाले असून त्यातून ८०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. आणखी काही प्रकल्पही प्रस्तावित असून येत्या काही दिवसांत उलाढालीचा हा आकडा हजार कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे.

करारांतर्गत चित्रपट निर्मिती

● ‘वेव्हज बाजार’मध्ये भारत आणि युके यांची पहिली संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. एनएफडीसी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहभागातून तयार होणारा ‘देवी चौधुरानी’ हा ऐतिहासिक चित्रपट या करारांतर्गत निर्माण करण्यात आला असून यात बंगाली कलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी आणि श्रबंती चॅटर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय, युकेच्याच निर्मितीसंस्थेबरोबर ‘व्हायोलेटेड’ हा आणखी एक थरारपट संयुक्तरित्या तयार करण्यात येणार आहे.

● फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅन्टबरी एनझेड या न्यूझीलंड येथील कंपनीमध्येही करार झाला असून त्याअंतर्गत पहिल्यांदाच न्यूझीलंड येथे भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

● रशिया आणि भारतीय कंपन्यांमध्येही विनोदी कार्यक्रम, संगीत कार्यक्रमांचे आयोजन आणि दोन्हीकडे चित्रपट महोत्सवांचे आयोजन अशा विविध प्रकल्पांसाठी करार करण्यात आले आहेत.